Education Department : शाळा सुरू होऊन दोन महिने उलटून गेलेत, तरी गणवेशाचे कापड अद्याप शाळांना मिळालेले नाही. पण बूट मात्र नवीन मिळाले आहेत. त्यामुळे शाळकरी मुलांच्या पायात नवे कोरे बुट आणि अंगात मात्र जुनाच गणवेश आहे. विद्यार्थ्यांसोबत सरकारची थट्टा चालली आहे का? की ‘लाडक्या बहिणी’च्या प्रेमात मुख्यमंत्र्यांना विद्यार्थी ‘सावत्र’ झाले आहेत का? असा संतप्त सवाल पालक करीत आहेत. जुन्याच गणवेशावर विद्यार्थ्यांनी अजून किती दिवस काढायचे, असेही विचारले जात आहे.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट व पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. शाळा सुरू होण्याच्या 15 दिवस आगोदरच शाळेत पुस्तके दाखल झाली. या पुस्तकांचे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. बुटाचे पैसे शाळा समितीच्या खात्यात जमा केले. त्यातून बुटांची खरेदी झाली. मात्र, अजून गणवेशाचा पत्ता नाही. पूर्वी गणवेशाचे पैसे शाळा समितीच्या खात्यावर जमा केले जात होते. त्यातून शाळा गणवेशाचे कापड खरेदी करून गावातील एखाद्या टेलरकडून कपडे शिवून घेत होते.
शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना गणवेश मिळतील अशी तरतूद केली जात होती. यावर्षी शासनाने पहिल्यांदाच राज्यातील सर्वच शाळांना गणवेशाच्या कापडाचा पुरवठा करण्याचे कंत्राट एकाच व्यक्तीला दिले आहे. या कंत्राटदाराकडून अद्याप शाळांना कापड उपलब्ध झालेले नाही. पालक विद्यार्थी सतत मुख्याध्यापकांकडे गणवेशाबाबत विचारणा करीत आहेत.
स्वातंत्र्यदिन जुन्याच गणेवशावर
गणवेश कधी मिळणार याचे उत्तर मुख्याध्यापकांकडे सुद्धा नाही. याबाबत शिक्षणाधिकारी यांना विचारले ते देखील निरुत्तर झाले. शाळा सुरू होऊन दोन महिने झाले आहे. तरी देखील गणवेशाचे कापड मिळालेले नाही. स्वातंत्र्य दिनालाही मुलं जुन्याच गणवेशात आली. आता गणवेशाचे कापड मिळाले तरी ते शिवणार कधी, मुलांना मिळणार कधी हा प्रश्न आहेच.
Assembly Election : जम्मुतील सुरक्षेमुळे महाराष्ट्रातील निवडणुकीला ‘ब्रेक’
मुलांचा हिरमोड
गणवेश मिळत नसल्याने मुलांचा हिरमोड होत आहे. त्यामुळे अनेक पालकांनी स्वातंत्र दिनानिमित्त आता स्वखर्चातून मुलांना गणवेश घेतले आहे. दोन महिने झाले शाळा सुरू होऊन, अजूनही मुलांना गणवेश मिळाले नाहीत. अजून किती दिवस वाट पाहायची? हा प्रश्न पालक विचारत आहेत. अनेक पालकांनी स्वखर्चाने आता गणवेश घ्यायला सुरवात केली आहे.