महाराष्ट्र

MNS Vs NCP : मिटकरींची कार फोडणाऱ्यांपैकी जय मालोकारचा मृत्यू

Akola Politics : हृदयविकाराचा धक्का आल्याने रुग्णालयात केले होते दाखल

Tragic Turn To Protest : आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनावरील हल्ला प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. या घटनेत सहभागी असलेले मनसे पदाधिकारी जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. जय हे स्वत: डॉक्टर होते. मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. 30) आमदार अमोल मिटकरी यांच्या कारवर हल्ला केला. शासकीय विश्रामगृहात हा राडा सुरू असताना मोठी झटापट झाली. त्यात पंकज साबळे यांच्यासोबत जय मालोकारही होते. घटनेनंतर जय यांच्या छातीत प्रचंड वेदना होऊ लागल्या. त्यांना अस्वस्थ वाटण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांना रुग्णालयात दाखल केले. 

डॉक्टरांनी प्रथमोपचार केल्यानंतर जय मालोकार यांना हृदयविकाराचा धक्का आल्याचे निदान केले. उचार सुरू असतानाच सायंकाळी साडेसातच्या सुमारास जय मालोकार यांचा मृत्यू झाला. जय मालोकार यांचे नाव मिटकरींच्या वाहनावर हल्ला करणाऱ्या आरोपींमध्ये होते. सिव्हिल लाइन्स पोलिस ज्यावेळी पंकज साबळे यांच्यासह मनसेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करीत होते, त्यावेळी जय हे मृत्युंशी झुंज देत होते. मात्र गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया पूर्ण होत आली असतानाच जय यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

राजकीय वादात बळी

राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर मनसे आणि आमदार मिटकरी यांच्यात वादाला सुरुवात झाली. मंगळवारी मनसेची पत्रकार परिषद शासकीय विश्रामगृहात सुरू असतानाच मिटकरी तेथे आले. त्यामुळे मनसेचे पदाधिकारी चिडले. बैठकीत मिटकरी यांच्याबाबत चर्चा सुरूच होती. मिटकरी दिसतील तिथे ठेचा. त्यांना पांढरे फासा. त्यांना बांगड्या भरा अशी भाषा बैठकीत सुरूच होती. अशात ते स्वत: विश्रामगृहाच्या परिसरात आल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांच्या संतापाचा भडका उडाला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मिटकरींच्या वाहनाची तोडफोड सुरू केली. मिटकरींचे समर्थक, मनसे पदाधिकारी यांच्यात त्यावेळी प्रचंड झटापट झाली.

दोन्ही बाजुचे लोक एकमेकांशी भीडले. काही वेळेनंतर पोलिसही दाखल झालेत. मात्र तोपर्यंत काळाची छाया जय मालोकार यांच्यावर पडली होती. झटापटी नंतर लगेचच त्यांच्या छातीत दुखायला लागले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना ही बाब सांगितली. सहकाऱ्यांनी तातडीने जय मालोकार यांना डॉक्टरकडे नेले. मात्र तोपर्यंत काळाची छाया अधिक गडद झाली होती. जय यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. डॉक्टरांनी त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे अकोला मनसेने आपला एक पदाधिकारी गमावला. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!