‘माझे अजित पवारांबरोबर अनेक बाबतीत मतभेद आहेत. इतरांचेही असतील. परंतु, जी गोष्ट योग्य आहे ती योग्य आहे. मी ठामपणे सांगतो की, अजित पवार कधी जातीच्या राजकारणात पडले नाहीत. जातीच्या बाबतीत कधी त्यांचं एखादं वक्तव्य मी ऐकलं नाही. ते या भानगडीत कधीच पडले नाहीत,’ या शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.
छत्रपती संभाजी नगर येथे पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ‘जातीपातीचं राजकारण टोकाला पोहोचलं आहे. असा महाराष्ट्र तुम्ही यापूर्वी कधी पाहिला होता का? तुम्ही सर्व पत्रकार मंडळी अनेक वर्षांपासून मराठवाड्यात काम करत आहात, तुम्ही तरी कधी असा महाराष्ट्र पाहिला होता का?’
राज ठाकरे सातत्याने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. तसेच जातीपातीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली असा आरोप राज ठाकरे यांनी आतापर्यंत अनेकदा केला आहे. ‘आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल फार का बोलत नाही?’ असा प्रश्न राज यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर ते म्हणाले, ‘मी अजित पवारांबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ते पूर्वी शरद पवारांबरोबर होते, पवारांचं जातीचं राजकारण चालू होतं. जेम्स लेन वगैरे प्रकरण चालू होतं. मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो की अजित पवार हे कधीही जातीच्या राजकारणात पडले नाहीत.’
अचानक झाला बदल
बीड येथे दौऱ्यावर असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यावर काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या होत्या. यानंतर छत्रपती संभाजी नगर येथे बोलताना राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांवर जोरदार हल्ला केला. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे राज्यात जातीय राजकारण करत असून त्यांना मराठवाड्यात दंगली घडवायच्या आहेत, असा आरोपच राज ठाकरेंनी केला आहे. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकारणाबाबत भाष्य केलं. या अचानक झालेल्या बदलाची सर्वत्र चर्चा होत आहे.