Political War : ‘रामदास आठवले साहेब तुमचा पूर्ण आदर बाळगून एवढंच सांगू इच्छितो, गोपीनाथ मुंडे यांनी तुम्हाला भाजपच्या झाडाच्या खाली आणले. तुम्ही त्या झाडावर चढलात आणि आता भाजपच्या झाडाचे बांडगूळ झाले आहात. तुमच्यामुळे भाजपला काही फायदा होत नाही, पण भाजपमुळे तुम्ही अखंड मंत्री पदावर आहात ते तुम्ही लक्षात घ्यावं. दुसऱ्यावर टीका करताना आपण काचेच्या घरात आहोत, याचा त्यांनी विचार करावा,’ या शब्दांत मनसे नेते प्रकाश महाजन यांनी आठलेंवर जोरदार हल्लाबोल केला.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर खोचक टीका केली होती. ‘राज ठाकरे यांची या निवडणुकीत हवा गेली. त्यांना वाटायचे माझ्याशिवाय सत्ता येणार नाही. त्यांचे स्वप्न भंग झाले. राज यांना महायुतीत घेण्याचा फायदा नाही. मी असताना त्यांची काय गरज आहे,’ असं आठवले यांनी म्हटलं होतं. आठवले यांच्या या टीकेला आता मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी यावरून आठलेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.
नेमकं काय म्हणाले होते आठवले?
राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका करताना रामदास आठवले म्हणाले होते की, ‘पुढे काय निर्णय होणार आहे हे मला माहिती नाही. पण महायुतीमध्ये राज ठाकरे यांना घेण्यात अजिबात फायदा नाही. त्यांची हार्डलाईन असल्यामुळे त्यांचा विशेष आपल्याला फायदा होणार नाही. मी महायुतीसोबत असताना त्यांची काय आवश्यकता आहे? त्यांची महायुतीमध्ये आवश्यकता नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही त्यांना बरोबर घ्याल पण ते येतील की नाही माहिती नाही.’ ‘महापालिकेच्या निवडणुकीत काय निर्णय होईल मला माहिती नाही. पण तिथे त्यांचा फायदा होऊ शकतो. काही ठिकाणी त्यांचा थोडा उपयोग होऊ शकतो. काय निर्णय घ्यायचा तो देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार घेतील. माझं व्यक्तिगत मत आहे की, त्यांना सोबत घेतल्याने महायुतीचं नुकसानच होणार आहे,’ अशी स्पष्ट भूमिका रामदास आठवले यांनी व्यक्त केली होती.
Supreme Court : नोकरी 1985 मध्ये, 2010 मध्ये कळले देशाचा नागरिकच नाही
राज ठाकरेंनाही निकालावर शंका
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचा मुख्यमंत्री होईल, असे भाकित राज ठाकरे यांनी आधीच वर्तवले होते. पण, निकालानंतर त्यांची प्रतिक्रिया वेगळी होती. सत्ता आल्याचे आश्चर्य नाही, पण निकाल अनपेक्षित आणि अनाकलनीय आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती. निकालावर अप्रत्यक्ष शंकाच राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.