Cinema Wing : एका उपग्रह वाहिनीवर सुरू झालेले मराठी बिग बॉस स्पर्धकांच्या अतिरेकी बडबडीमुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना सरकारने उत्कृष्ट कार्यासाठी दिलेला पुरस्कार, मालवणी मराठी भाषा नाही अशी टिप्पणी या रिअॅलिटी शोमध्ये करण्यात आली होती. ज्या टीमने ही टिप्पणी केली, त्याच टीमचे ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या मातृत्वावरही प्रश्न उपस्थित केला होता. पुरुषांना बांगड्या भरा असा टोमणाही लगावला होता. यावरुन शोचे होस्ट अभिनेता रीतेश देशमुख स्पर्धकांवर भडकले होते. रीतेश देशमुख यांचे राजकीय आणि सिने जगत असे दुहेरी नाते आहे. अशातच टीआरपी वाढविण्याच्या नादात या शोमधील स्पर्धक जान्हवी यांनी मराठी अभिनेता पंढरीनाथ ऊर्फ पॅडी कांबळे यांच्या अभिनय कलेवरच प्रश्नचिन्ह लावले आहे. त्यामुळे या वादात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे.
मनसेच्या सिनेमा विंगचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी या प्रकाराबद्दल सोशल माध्यमावर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. उपग्रह वाहिनीवर सुरू असलेल्या या रिअॅलिटी शो मधील काही अतिउत्साही स्पर्धत रागाच्या भरात सातत्याने असे आक्षेपार्ह विधान करीत आहेत. टीआरपीच्या नादात अशा वादग्रस्त दृष्यांचे प्रक्षेपणही होत असल्याचा आरोप सोशल मीडियावर होत आहे. वाद वाढल्यानंतर या स्पर्धकांना रीतेश देशमुख यांच्या माध्यमातून रागावलेही जात आहे. मात्र हा प्रकार तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करेल असा तर नाही ना? असा प्रश्न आता दर्शकांकडून उपस्थित होत आहे.
वादग्रस्त विधानांची मालिकाच
बिगबॉस मराठी या रिअॅलिटी शोमध्ये महाराष्ट्र सरकारने दिलेला पुरस्कार, महिलांचे दुबळेपण, एका महिलेचे मातृत्व अशा संवेदनशील विषयांवर अत्यंत प्रक्षोभक विधान केले जात आहे. मात्र पॅडी कांबळे यांच्यावरील टीकेनंतर प्रथमच बिगबॉसच्या घरात सुरू असलेल्या वादात एखाद्या राजकीय पक्षाने हस्तक्षेप केला आहे. शो प्रसारित करणाऱ्यांनी आपल्या स्पर्धकांना वेळीच आवर घालण्याची गरज त्यामुळे व्यक्त होत आहे. खोपकर यांनी यासंदर्भात पोस्ट टाकल्यानंतर त्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
सोशल मीडियावर सुमारे 15 हजारवर लोकांनी ही पोस्ट पाहिली आहे. या पोस्टवर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. काम नसलेल्या लोकांना एकत्रित करून विनाकारण वाद निर्माण केला जात असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. मात्र या साऱ्या नादात स्पर्धक, शोचे निर्माता, प्रसारण करणारी वाहिनी प्रसंगी सरकार, महिला सक्षमीकरण, महिलांचे मातृत्व आणि एकमेकांवर खालच्या पातळीवर होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही होत आहे. त्यामुळे या शोमुळे ऐन निवडणुकीपूर्वी नव्या वादाला तोंड फुटू नये असे अनेकांचे मत आहे. एखाद्या स्पर्धकाच्या तोंडून निघालेल्या कोणत्या वाक्याला आपल्या राजकीय फायद्यासाठी कोण कसा रंग देईल याचा नेम नाही. त्यामुळे सगळेकाही सांभाळून करा, असा सल्लाही अनेकांनी या शोच्या निमित्ताने निर्मात्यांना दिला आहे.