MNS Chief Visit : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. राज्यातील अनेक विधानसभा मतदारसंघात मनसे उमेदवार उतरविणार आहे. त्याची चाचपणी सध्या करण्यात येत आहे. लवकरच मनसे काही मतदारसंघांमध्ये उमेदवारांच्या नावाची घोषणा करू शकते. मात्र त्यापूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत. लवकरच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये राज यांच्या सभा होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला साथ दिली. मात्र आता मनसे विधानसभा लढविण्याच्या तयारीत आहे.
ऑगस्टच्या अखेरीस राज ठाकरे विदर्भात येऊ शकतात असे सांगण्यात येत आहे. त्यापूर्वी पक्षाचे निरीक्षक अनेक मतदारसंघाचा दौरा करून कानोसा घेत आहेत. यापैकी अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांवर सध्या मनसेने चांगले लक्ष केंद्रीत केले आहे. संभाव्य उमेदवारांची नावे मागविण्यात आली आहे. मात्र या नावांबद्दल अद्याप निरीक्षक आणि स्थानिक नेत्यांनी गुप्तता बाळगली आहे. उमेदवारांच्या नावांची घोषणा राज ठाकरेच करतील, असे सांगण्यात येत आहे.
फायदा कोणाला?
राज ठाकरे निवडणूक रिंगणात उतरल्यास त्याचा फायदा महायुतीला होणार की महाविकास आघाडीला यावर चर्चा सुरू झाली आहे. सुरुवातीला राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची स्तुती केली. मध्यंतरीच्या काळात त्यांनी मोदींविरोधात आघाडीच उघडली. आता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा मोदींच्या बाजुने होते. उद्धव ठाकरे हे भाजपला सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यासोबत गेले आहेत. त्यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) स्थापन केली आहे. त्यामुळे राज ठाकरे आपल्या बाजुने यावे असे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना वाटत आहे. परंतु राज ठाकरे महायुतीमध्ये (Mahayuti) येण्याबाबत अद्याप अस्पष्टता आहे.
मनसेला यश मिळाल्यास राज ठाकरेच मुख्यमंत्री व्हावेत अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाचे आधीच तीन दावेदार आहे. शिवसेनेला (Shiv Sena) एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री हवे आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणताही नेता मुख्यमंत्री होऊ नये असे सेनेला वाटत आहे. भाजपकडून (BJP) मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव नेहमीप्रमाणे यंदाही आघाडीवर आहे. महाविकास आघाडीमध्ये खिंडार पाडल्यानंतर फडणवीस यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी होती. परंतु त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री केल्याचा प्रचार भाजपकडून करण्यात येतो.
Shiv Sena : निलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘माशाच्या डोळ्याप्रमाणे..’
महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसही (NCP) बरीच महत्वाकांक्षी आहे. त्यांना विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हेच मुख्यमंत्री हवे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये 90 जागांसाठी आग्रही असल्याचे स्वत: मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी स्पष्ट केले. अशात राज ठाकरे महायुतीमध्ये येतील का? याबद्दल अनेक शंका उपस्थित होत आहे. सरकार जरी महायुतीचे असले तरी राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील अत्यंत महत्वाचा दुवा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच आहेत. त्यामुळे राज ठाकरे फडणवीस यांच्याशी जुळवून घेतील का? याबद्दलही तर्कवितर्क लावण्यात येत आहे. असे असले तरी मनसे रिंगणात उतरल्यास मतदारांना आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.