War For Power : लवकरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे शुक्रवारपासून (27 सप्टेंबर) दोन दिवस अमरावती दौऱ्यावर आहेत. अमरावती रेल्वे स्थानकावर सकाळी राज यांचे आगमन झाले. ठाकरे येताच कार्यकर्त्यांनी पुष्पवर्षाव केला. फटाक्यांची आतंषबाजी केली. अमरावतीच्या रेल्वे स्थानकावर ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या अमरावती रेल्वे स्थानकावरून राज ठाकरे हे हॉटेल मॅप इन येथे पोहोचले. सकाळी दहा वाजल्यापासून त्यांनी अमरावती विभागातील विधानसभानिहाय पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यास सुरुवात केली. अमरावती विभागातील अमरावती अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ या पाचही जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले.
आधी पश्चिमचा निर्णय
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक राज ठाकरे घेणार आहेत. त्यानंतर शनिवारी (28 सप्टेंबर) नागपूर महसूल विभागातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत राज ठाकरे चर्चा करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते रणनीती ठरविणार आहेत. यासह योग्य उमेदवारांची चाचपणी हा या दौऱ्यामागचा उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वीही राज ठाकरे विदर्भात दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी विदर्भातील बोटावर मोजण्याइतक्या मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. त्यानंतर मनसेच्या काही कार्यकर्त्यांमध्ये राडाही झाला होता. चंद्रपूर जिल्ह्यात आरोप-प्रत्यारोप झाला होता.
उमेदवाराच्या नावाची घोषणा..
चंद्रपूरनंतर (Chandrapur) राज ठाकरे यवतमाळ येथे गेले होते. तेथे त्यांनी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर मात्र त्यांनी कोणत्याही उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही. राज ठाकरे यांच्या राज्यातील काही सभांमध्ये गोंधळाचा प्रयत्नही झाला. त्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना चांगली समज दिली. काही कार्यकर्त्यांना त्यांनी बैठकीच्या ठिकाणाहून बाहेरही काढले. त्यानंतर मोजक्याच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मात्र त्यांनी कोठेही उमेदवारांच्या नावाबाबत वाच्यता केली नाही. त्यामुळे यंदा ते दौऱ्यात उमेदवारांच्या नावाची घोषणा करतात काय, याची उत्सुकता सर्वांना आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत एडीएला पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी मनसेने ठेवली आहे. मनसे महायुतीमध्ये (Mahayuti) यावी असाही प्रयत्न सुरू आहे. मात्र यासंदर्भात राज ठाकरे यांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे अमरावतीत ते काय घोषणा करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.