Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी असलेली जवळीक लपून राहिलेली नाही. त्यामुळेच भाजपच्या विरोधात त्यांनी उभे केलेले उमेदवार आपले नामांकन अर्ज माघारी घेतील, अशी जोरदार चर्चा होती. 4 नोव्हेंबरला तसे झाले नाही. पण काल (5 नोव्हेंबर) रात्री राज ठाकरेंनी आदेश दिले. अन् आज सकाळी नागपुरातील त्यांच्या दोन सैनिकांनी अनुक्रमे हिंगणा आणि दक्षिण नागपूरमधून माघार घेत असल्याची घोषणा केली.
हिंगण्यामध्ये भाजपचे विद्यमान आमदार समीर मेघे आणि दक्षिण नागपूर मतदारसंघातील आमदार मोहन मते यांना मनसेचे जिल्हाध्यक्ष यांनी पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. मागील काळात राज ठाकरे जेव्हा नागपुरात आले होते. तेव्हा रवी भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातील 200 पेक्षा जास्त मतदारसंघात मनसेचे उमेदवार लढतील, असे सांगितले होते. नागपूरच्या संदर्भात जेव्हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा नागपूर शहरातील सहाही मतदारसंघात मनसेचे सैनिक लढतील, असे ते म्हणाले होते. पण आज दोन उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंच्या ‘त्या’ घोषणेचे काय झाले, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
समीर मेघे यांना पाठिंबा
यासंदर्भात मनसेचे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरूगकर यांनी आज (6 नोव्हेंबर) माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार हिंगणा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार समीर मेघे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना जाहिर पाठिंबा देत आहे. सोबतच ज्या मतदारसंघातून मला उमेदवारी देण्यात आली होती, त्या दक्षीण नागपूर मतदारसंघात भाजपचे उमेदवार मोहन मते यांनाही मनसेकडून जाहीर पाठींबा घोषीत करण्यात येत असल्याचे दुरूगकर यांनी सांगितले.
Daryapur Constituency : युवा स्वाभिमानमुळे महायुतीमध्ये तणाव
मनसेच्या उमेदवारांनी महायुतीच्या उमेदवारांना तगडी फाईट देण्याची तयारी केली होती. पण आता त्याच उमेदवारांना पाठिंबा द्यावा लागल्यामुळे कुठेतरी त्यांचा हिरमोड झालेला दिसतोय. यासंदर्भात दुरूगकर म्हणाले, काही तांत्रिक अडचणीमुळे मला आणि हिंगण्यातून किनकरांना नामांकन अर्ज माघारी घेता आला नाही. पण राज ठाकरेंचा आदेश झाला आहे. त्यामुळे आम्ही या दोन्ही उमेदवारांचे काम करू.
भाजपसोबत मनसेची जवळीक का वाढत चालली आहे, असे विचारले असता, वरच्या स्तरावर काय चालले आहे, तो आमचा प्रश्न नाही. ते राज ठाकरे बघतील. आमच्यासाठी त्यांचा आदेश महत्वाचा आहे. आम्ही आदेशाचे पालन करणार असल्याचे दुरूगकर यांनी सांगितले. आम्हालाअधिकृतपणे अर्ज माघारी घेता आला नाही. त्यामुळे बॅलेट पेपरवर आमची नावे आणि चिन्ह असणार आहे. पण राज ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे आम्ही भाजपच्या उमेदवारांसोबत राहू, असेही आदित्य दुरूगकर म्हणाले.