महाराष्ट्र

Assembly Elections : हिंगण्यात मनसे भाजपसोबत नाही!

Hingna Constituency : उमेदवाराचा भाजपला पाठिंब्यास नकार

BJP & MNS : राजकारणात कधी कुठली चाल तिरपी पडेल व सर्व गणितांचा बट्ट्याबोळ होईल हे सांगता येत नाही. पक्षाने भाजपला पाठिंबा दिला असतानादेखील उमेदवार मात्र लढण्यावर ठाम आहे. त्यामुळे हिंगणा विधानसभा मतदारसंघात ट्विस्ट निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवारी मागे घेऊन भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला असताना पक्षाचे उमेदवार बिजराम किनकर यांनी उमेदवारी मागे घेण्यात नकार दिला आहे. मतदारसंघातील धनाढ्य लोकांपुढे मी झुकणार नाही. कुणालाही पाठिंबा देणार नाही. पक्षाचे चिन्ह मिळाले असून निवडणूक ताकदीने लढणार असल्याचा दावा हिंगणा मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार बिजराम किनकर यांनी केला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी माझी उमेदवारी जाहीर केली. नंतर पक्षाने हिंगणा मतदार संघात भाजपला पाठिंबा जाहीर केला. हिंगणा मतदारसंघातून मनसे उमेदवाराने माघार घेतल्याचे पत्र मनसे अध्यक्षांनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. स्थानिक नेत्यांनी हा प्रकार घडवून आणला. परंतु मला कोणतीही माहिती दिली नाही. पक्षाने उमेदवारी मागे घेण्यास सांगितलेले नाही. मला पक्षाची निशाणी मिळाली आहे. आता मला उमेदवारी मागे घेण्यास सांगितले तरी मी उमेदवारी मागे घेऊन कुणालाही पाठिंबा देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मी मागील पाच वर्षापासून निवडणुकीची तयारी करीत असून निवडणूक लढणार असल्याचे बिजराम किनकर यांनी सांगितले. काही धनाढ्य लोकांना पैशाच्या जोवर आपण निवडणूक जिंकू, असे वाटते. परंतु मला हिंगणा मतदारसंघात परिवर्तन घडवायचे आहे. माझी उमेदवारी कायम आहे. हिंगणा मतदारसंघात मागील दहा वर्षात कोणताही विकास झाला नाही. एमआयडीसीमधील उद्योग गुजरातला गेले. स्थानिकांना परिवर्तन घडवायचे असल्याचे किनकर म्हणाले.

Assembly Elections : मध्य नागपुरात विनापरवानगी होतोय प्रचार!

मोहन मतेंना पाठिंबा!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्य आदित्य दुरुगकर यांनी एका पत्राद्वारे दक्षिण नागपूरचे भाजपचे उमेदवार मोहन मते यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मोहन मते यांनी ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल करून राज ठाकरे यांचे आभारही मानले आहेत. मात्र, जिल्हाध्यक्षांच्या स्वाक्षरीने आलेल्या या पत्राला हिंगणा मतदारसंघातील मनसेच्या उमेदवाराने स्वीकारण्यास नकार दिला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!