Political war : बारामती मतदारसंघात पोलिस ‘बंदोबस्तात’ पडतोय पैशांचा पाऊस… असे खळबळजनक ट्विट आमदार रोहित पवार यांनी केले. त्यामुळे राजकीय पारा चढला. त्यात आमदार अमोल मिटकरी यांनी रोहित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. मानसिक संतुलन गेलेल्या बालिश नेत्याने गुंडांना हाताशी धरून पैसे वाटप केल्याचे मध्यरात्री समोर आले आहे.अजित पवार यांची बाजू सावरण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
आज बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान आहे. तत्पूर्वी मध्यरात्री रोहित पवार यांनी विरोधकांकडून पैसे वाटले जात असल्याचा आरोप केला. त्यांच्या या ट्विटने आता चर्चांना उधाण आले आहे. बारामतीचे राजकारण चांगलेच तापले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी मतदान पार पडत आहे. राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात मतदान आहे. या सगळ्यात हाय व्होल्टेज निवडणूक बारामती मतदारसंघात होत आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यात लढत आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या ट्विटने सध्या खळबळ उडवून दिली आहे.
Lok Sabha Election : भाजपच्या 5 नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा उद्धव ठाकरेंचा प्लॅन
‘बारामती मतदारसंघात पोलिस बंदोबस्तात पडतोय पैशांचा पाऊस. असा आरोप असून भोर तालुक्यातील काही व्हिडिओ शेअर झाले. यामध्ये भोर तालुक्यातील ‘अजितदादा मित्रमंडळा’चा पदाधिकारी आणि मावळ मधील एका नेत्याचे कार्यकर्तेही दिसतायेत… यासाठीच पाहिजे होती का वाय दर्जाची सुरक्षा? अशा आशयाचे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. त्यांनी या ट्विटसह अनेक व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. यामध्ये पोलिसांमोरच मतदानासाठी पैसे दिले जात असल्याचे दिसून येत आहे.
काय म्हणाले मिटकरी
आमदार रोहित पवार यांनी अजित पवार समर्थकांकडून पैसे वाटण्यात येत असल्याचा आरोप केला. त्यानंतर अजित पवार यांचे कट्टर समर्थक आमदार अमोल मिटकरींनीही आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप करीत टीका केली आहे. मिटकरींनी ट्विट करीत टीका केली आहे. ‘दादांना बदनाम करायला जाणीवपूर्वक कुरापत काढली. मध्यरात्री भोर वेल्हे परिसरात मानसिक संतुलन गेलेल्या बालिश नेत्याने आपल्या गुंडांना हाताशी धरून पैसे वाटप केले. मध्यरात्री तसे समोर आले आहे. मात्र, पोलिसांनी डाव उधळून लावला. तर दुसऱ्या ट्विट मध्ये ‘बारामती अॅग्रोवरून भोर वेल्ह्यात नोटा वाटप… व्हिडिओतून राष्ट्रवादीवर आरोप करण्याचा भाडोत्री गुंडाचा प्रयत्न’ असा आरोप ही मिटकरी यांनी केला आहे.