विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी रवी राणा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी तक्रारही नोंदवली आहे. ‘माझ्या जिवाचे काही बरे-वाईट झाले तर त्यासाठी अमरावतीचे आमदार रवी राणा जबाबदार असतील. याशिवाय पहिले आरोपीसुद्धा तेच राहतील,’ अशी लेखी तक्रार नितीन कदम यांनी केली आहे.
अमरावतीतील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात कदम यांनी ही तक्रार नोंदविली. यामुळे बडनेरा मतदारसंघात निवडणुकीपूर्वीच राजकीय संघर्ष पेटल्याचे बघायला मिळत आहे. ‘27 ऑगस्टला सकाळी घरी असताना आम्हाला माहीती झाले की, आमदार रवी राणा यांच्या सांगण्यावरून त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते अश्विन उके, वैभव गोसामी माझी बदनामी करत आहेत. ते समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल करत आहेत. अश्लील भाषेत शिवीगाळ करून मला जिवे मारण्याची धमकीसुद्धा त्यांनी दिली. यामुळे रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांपासून मला व माझ्या कुटुंबाला धोका आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा आणि कठोर कारवाई करावी, अशी विनंती आम्ही केली आहे,’ असे कदम यांनी म्हटले आहे.
नितीन कदम यांनी संकल्प शेतकरी संघटनेतर्फे शरद पवार गटाचे नेते तथा आमदार रोहित पवार यांचे 26 ऑगस्टला अमरावतीत जंगी स्वागत केले. त्यामुळे रोहित पवारांच्या स्वागताचे पोस्टर ठिकठिकाणी लावण्यात आले होते. परंतु काही लोकांकडून हे पोस्टर्स फाडण्यात आले. रवी राणांच्या सांगण्यावरून त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे पोस्टर्स फाडले, असा आरोपही नितीन कदमांनी केला आहे.
राणांच्या सांगण्यावरून कारवाई
26 ऑगस्टला आमदार रोहीत पवार अमरावती दौऱ्यावर होते. या अनुषंगाने आम्ही संकल्प शेतकरी संघटनेतर्फे त्यांचे स्वागत करणार होतो. यासाठी आम्ही चौकात त्यांच्या स्वगताचे पोस्टर्सही लावले होते. परंतु ते पोस्टर लावल्यानंतर मानपाने रवी राणांच्या सांगण्यावरुन कारवाई केली. दुपारी परत स्वगताचे बॅनर्स लावले. आम्ही रोहीत पवार यांचा स्वागत समारंभ केला. कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही घरी परतलो असता रुख्मीणी नगर येथील ऑफिसजवळ काही पोलिस कर्मचारी आले. त्यांनी मला सांगितले की, युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्ते माझ्यावर हल्ला करण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यामुळे मला, माझ्या कुटुंबातील सदस्यांना तसेच संकल्प शेतकरी संघटनेतील लोकांचे बरे-वाईट झाले तर त्याला राणा व त्यांचे कार्यकर्ते जबाबदार राहतील, असे कदम यांनी म्हटले आहे.
बबली झाली, आता बंटीची बारी
मागील काही वर्षांपासून संकल्प शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी व सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडविण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. जनेतेत राहुन आम्ही गोरगरिबांच्या समस्या सोडवित आहोत. मला विधानसभेसाठी बडनेरा मतदारसंघातून महाविकास आघाडीने उमेदवारी दिली नाही, तर मी अपक्ष निवडणूक लढविणार, असे कदम म्हणाले. यावेळी लोकसभा निवडणुकीत बबली गेली, आता विधानसभा निवडणुकीत बंटी घरी जाणार, असा खोचक टोलाही नितीन कदम यांनी लगावला.