Oppose To EVM : महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळाले आहे. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. मतदान यंत्रामध्ये गडबड करून हा विजय मिळवण्यात आल्याचा आरोप काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून होत आहे. काँग्रेसने ईव्हीएमच्या विरोधात मतदारांची स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर दररोज निवडणूक आयोगावर हल्ला सुरू केला आहे. काँग्रेसला या भूमिकेवर भाजपचे नेते आमदार परिणय फुके यांनी निशाणा साधला आहे.
ईव्हीएम बद्दल काँग्रेसच्या मनामध्ये इतकीच शंका असेल तर त्यांनी आधी भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदारसंघात निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा वापर न करता मतपत्रिकांचा वापर निवडणूक आयोगाने करावा. निकाल आल्यानंतर काँग्रेस आणि नाना पटोले यांना कोण किती पाण्यात आहे, हे कळेल असा हल्ला फुके यांनी केला. नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना परिणय फुके यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला केला.
कामच शिल्लक नाही
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेसने राज्य केले. परंतु कधीही सामान्य माणसासाठी कोणतेही काम केले नाही. त्यामुळे मतदारांनी काँग्रेसवर बहिष्कारच टाकला आहे. हाती काही काम नसल्याने काँग्रेसच्या डोक्यातून वेगवेगळे षडयंत्र तयार होत असतात. नाना पटोले यांनी देखील अशीच एक कल्पना डोक्यातून काढली आहे. साकोली मतदारसंघातून पटोले यांचा अवघ्या 207 मतांनी विजय झाला आहे. नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते. त्यांना स्वतःला किती कमी मतं मिळाल्याने, काँग्रेसचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे, असं फुके म्हणाले.
विकास कामे केली नसल्याने मतदारांनी त्यांना कमी मतदान केलं. त्याचं खापर आता नाना पटोले ईव्हीएमवर फोडत आहेत. ईव्हीएममध्ये भरभरून मतं मिळवण्यासाठी भरपूर विकास काम करावी लागतात, असा टोलाही परिणय फुके यांनी लगावला. प्रदेशाध्यक्ष सारख्या व्यक्तीला अवघ्या काही शेकडा मतांनी विजय मिळतो. त्यामुळे नाना पटोले यांनी तर प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी देखील परिणय फुके यांनी केली.
राज्यातील महायुती सरकारनं सामान्यांच्या हिताची कामे केली आहेत. बहिणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम केली आहे. शेतकऱ्यांसाठी भरपूर योगदान दिले आहे. त्यामुळे सहाजिकच विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राने महायुतीची निवड केली. मात्र हा पराभव पचवता येत नसल्याने काँग्रेस आता ईव्हीएमवर संशयाचे बोट ठेवत आहे. काँग्रेसकडून वारंवार होणाऱ्या या अपप्रचाराकडे लोक लक्ष देणार नाहीत. लोकांनी निवडलेली महायुती त्यांच्यासाठी वेगाने विकास काम करेल आणि पुन्हा निवडून येईल, असा विश्वासही परिणय फुके यांनी व्यक्त केला.