Switching Party Before Election : विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. अशात बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. ‘प्रहार’चे राज्यातील एकमेव आमदार राजकुमार पटले हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. आमदार बच्चू कडू यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. एकनाथ शिंदेंनी आम्हाला एक घाव केला. आम्ही त्याच्या बदल्यात हजारो घाव देऊ, असा इशारा कडू यांनी दिला आहे.
कारण स्पष्ट होतं
प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते आमदार बच्चू कडू हे परिवर्तन महाशक्तीमध्ये सक्रिय झाले आहेत. अशातच आमदार पटले हे शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. आयाराम-गयारामांची संख्या वाढली आहे. नेत्यांची नाराजी चव्हाट्यावर येत आहे. बच्चू कडू, छत्रपती संभाजी राजे आणि राजू शेट्टी एकत्र आले आहेत. त्यांच्यासह काही छोट्या पक्षांनी परिवर्तन महाशक्ती आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीनं स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणाही केली आहे.
महायुतीला आव्हान
बच्चू कडू यांनी महायुतीला आव्हान दिले आहे. मात्र त्यांच्याच पक्षातील मेळघाट विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि बच्चू कडू यांचे निकटवर्तीय आमदार राजकुमार पटेल हे साथ सोडणार आहेत. यावर बच्चू कडू म्हणाले, प्रत्येकाचा एक राजकीय स्वार्थ असतो. त्यामुळे राजकुमार पटेल जात असतील तर त्याची आम्हाला पर्वा नाही. पटेल जातील तिथे त्यांनी सुखात राहावं. मात्र शिंदे गटाला सुद्धा याचे परिणाम भोगायला लावू. त्यांनी एक खेळी खेळली. आम्ही दहा खेळी खेळू.
आम्ही सुद्धा मैत्री कायम ठेवून राजकुमार पटेल यांच्या विरोधात उमेदवार देऊ. आमचे काही पदाधिकारी आम्हाला आणखी सोडून जातील. काही राजकीय तर काही आर्थिक हेतूने सोडून जातील. एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालय दिलं. त्याचं ऋण कायम आहे. पण त्यांनी खेळलेली खेळी त्यांनाच घातक ठरणार असल्याचा इशाराही बच्चू कडू यांनी दिला.
प्रहार मधून बाहेरच..
शिवसेना प्रवेशाबाबत बोलताना आमदार राजकुमार पटेल यांनी स्पष्ट केलं की, तिसऱ्या आघाडीचा मेळघाटमध्ये काही ताळमेळ नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना विश्वासात घेत आपण ‘प्रहार’मधून बाहेर पडलो. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जात आहोत. 10 ऑक्टोबरला मुख्यमंत्री धारणीला (Dharni) येणार आहेत. त्यांच्या उपस्थित आपण शिवसेनेत प्रवेश करणार आहोत. धारणीत आमदार पटेल यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.