महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : विदर्भात महायुतीकडून लढणार काँग्रेसचे आमदार?

Vidarbha Politics : महाविकास आघाडीतील उमेदवारीचे घोडे अडलेलेच

Lok Sabha Election 2024 : नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातून अद्याप उमदेवार ठरलेले नाहीत. काँग्रेसकडून उमेदवार कोण असेल याचा घोळ कायम आहे. शिवसेना, भाजपमध्येही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. मात्र सध्या रामटेक लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या घडामोडींनुसार विद्यमान खासदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) हे उमेदवार असतील की नाही, यावर प्रश्‍नचिन्ह लागले आहे.

उमरेड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार राजू पारवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे. पारवे यांनाच रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीची उमेदवारी मिळेल असे सांगण्यात येेत आहे. महायुतीने याची मात्र अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. राजू पारवे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांना भाजपमध्ये जाण्याची इच्छा आहे. अलीकडेच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘देवगिरी’वर जाऊन भेट घेतली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्यासोबत ते गेले होते. रामटेक लोकसभा मतदारसंघावर सध्या शिवसेनचा दावा आहे. भाजप या मतदारसंघासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र शिंदे सेना रामटेकवरचा दावा सोडायला तयार नाही. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडूनही रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी तयारी सुरू आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे कृपाल तुमाने दोनदा निवडून आले आहेत.

भाजपचा तुमाने यांच्या उमेदवारीला विरोध आहे. असाच विरोध बुलढाणा आणि यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाबाबत आहे. रामटेकमध्ये भाजपकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. रामटेक मतदारसंघात दोन आमदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला द्यावा, असा आग्रह भाजपकडून धरला जात आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मतदारसंघासाठी प्रयत्न सुरू केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेक मतदारसंघ भाजपसाठी सोडावा, असे आवाहन त्यांनी आहे. महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरे यांनी रामटेक मतदारसंघावरचा दावा सोडला आहे. त्यामुळे रामटेक लोकसभा मतदारसंघातून आता येथे काँग्रेस निवडणूक लढणार आहे.

पारवेंचे काय होणार?

निवडणुकीपूर्वीच्या या सर्व घडामोडी बघता आणि शिंदे सेनेचा आग्रह विचारात घेता राजू पारवे यांनी शिंदे सेनेत प्रवेश करून महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी, असे जवळपास ठरल्याची सांगितले जात आहे. त्यानुसार आमदार पारवे यांनी महायुतीत सहभागी असलेल्या अनेक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना फोन करून निवडणुकीत मदतीची विनंती केली असल्याचे समजते. दुसरीकडे मुंबईतील शिंदे सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी स्थानिकांना फोन करून पारवे की तुमाने हवे, याची विचारणा केल्याचेही समजते. असे झाल्यास रामटेकमध्ये पुन्हा काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा परंपरागत मुकाबला होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!