Political Twist : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या आमदार फुटल्याचा आरोप आहे. या आमदारांची ओळख पाठविण्यात काँग्रेसला यश आले आहे. यात मराठवाड्यातील तीन, उत्तर महाराष्ट्रातील दोन, मुंबई व विदर्भातील प्रत्येकी एका आमदाराचा समावेश आहे. झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके, शिरीष चौधरी, हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकर, मोहन हंबिर्डे यांनी ‘क्रॉस व्होटिंग’ केल्याचा दावा आहे. या सर्व आमदारांची नावे प्रदेश काँग्रेसने दिल्लीला पाठवली आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी ही माहिती दिली.
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत शेकाप उमेदवार जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असतानाही त्यांचा पराभव झाला. यामुळे हा पराभव महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे. सत्ताधारी महायुतीचे नऊ, विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचे दोन उमेदवार निवडून आलेत. या निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी ‘क्रॉस व्होटिंग’ केले.
प्रकरण तापले
चंद्रकांत हंडोरे यांच्यावेळेस या आमदारांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांची हिंमत वाढली होती, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नमूद केले. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी ‘क्रॉस व्होटिंग’ केले. यामुळे महाविकास आघाडीतील शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील यांनी यासंबंधीचा अहवाल दिल्लीला पाठवला आहे. अहवालाच्या आधारावर बंडखोर आमदारांवर पुढील आठवड्याभरात कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. या आमदारांवर आता कारवाई केली नाही तर पक्षाचे नुकसान होईल, असे अहवालात नमूद आहे.
काँग्रेसच्या आमदारांना बॅलेटवर एका विशिष्ट फॉरमॅटमध्ये मतदान करायचे होते. ज्यांनी त्या फॉरमॅटचे उल्लंघन केले त्यांना आम्ही पकडले. त्यांची ओळख पटवली. त्यानंतर त्यांची नावे दिल्लीला पाठवली आहेत. आता त्यांच्यावर एका आठवड्याच्या आत कारवाई अपेक्षित आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. काही आमदारांनी पक्षाशी बेइमानी केली.
आम्हाला हे बेइमान शोधून काढायचे होते. त्यामुळेच काँग्रेसने विधान परिषद निवडणूक लढवली. आता हे आमदार पकडले गेले आहेत. त्यामुळे होणाऱ्या कारवाईने सर्वांना धडा मिळेल, असे ते म्हणाले. आमदार कैलास गोरंट्याल यांनी क्रॉस व्होटिंग केल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण त्यात कोणतेही तथ्य नाही. आमदार गोरंट्याल हे पक्षनिष्ठ आहेत. त्यांच्याबाबत कोणतेही पुरावे नाहीत. त्यांनी बेईमानी केलेली नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले. लोकसभा निवडणुकीने महाराष्ट्रातील जनता आमच्या बरोबर असल्याचे दिसले. मात्र काही बेईमान आमदारांमुळे पक्ष बदनाम होत आहे. आता अशा लोकांविरुद्ध कारवाई नक्की होईल, असेही वडेट्टीवार म्हणाले.