महाराष्ट्र

Ravi Rana : राणा पुन्हा घेऊन आले रे बावा पाना

Badnera Constituency : निवडणूक आयोगाकडून दुसऱ्यांदा चिन्ह मिळाल्याने चर्चा

Yuva Swabhiman Party : लोकसभा निवडणुकीत अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र त्यांचे पती बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आपल्याच पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढणार आहेत. युवा स्वाभिमानी हा त्यांचा पक्ष. राणा यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी (ता. 6) पाना हे चिन्हं मिळाले आहे. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या याच चिन्हावर निवडून आल्या होत्या. त्यामुळे राणा पुन्हा घेऊन आले रे बावा पाना, अशी चर्चा अमरावतीत रंगली आहे.

राणा यांना पुन्हा पाना 

पुन्हा एकदा रवी राणा यांच्या पक्षाला पाना हेच चिन्ह मिळाल्याने आश्चर्यही व्यक्त करण्यात येत आहे. त्याची खमंग चर्चाही होत आहे. अशात आगामी विधानसभा निवडणुकीत रवी राणा यांचा पाना नेमका कोणाचे नट कसणार हे पाहण्यासारखे राहणार आहे. राणा यांचे अमरावती जिल्ह्यातील बहुतांश राजकीय नेत्यांशी वैर आहे. बोटावर मोजण्याइतके एकटदुकटच असे नेते आहेत, ज्यांच्याशी राणा यांचा पंगा झालेला नसेल. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सगळ्यांनीच नवनीत राणा यांच्या पराभवासाठी प्रयत्न केले. त्यात त्यांना यशही आले. राणा पराभूत झाल्या. आता राणा यांना राज्यसभेवर ‘बॅकडोअर एन्ट्री’ देण्याच्या तयारीत भाजप आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसे संकेतही दिले आहेत.

पुन्हा तिच चूक

अख्खी महायुती विरोधात असतानाही भाजपने सर्व स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून नवनीत राणा यांना पक्षात घेतलेही व उमेदवारही दिली. त्याचा परिणाम म्हणून भाजपला अमरावतीची जागा गमवावी लागली. नवनीत राणा यांच्यानंतर आता महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीमधील नेत्यांनी रवी राणा यांचा नंबर लावला आहे. काहीही झाले तरी बडनेऱ्यातून रवी राणा विजयी होऊ नये, असे प्रयत्न होणार आहेत. अशातच बावनकुळे यांनी राणा खासदार होतील, असे जाहीर वक्तव्य केले. त्यामुळे भाजपला स्थानिक आणि एकनिष्ठ नेत्यांपेक्षा राणा इतके जवळचे का झाले, असा प्रश्न आहे. त्यातच राणा यांना निवडणुकीपूर्वी चिन्ह मिळाले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यासह अमरावती मधील राजकीय समीकरणही बदलले आहे. अमरावतीमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अमरावतीमध्ये रवी राणाही सज्ज झाले आहेत. आता तर त्यांना आयोगाने चिन्हही दिले आहे. त्यामुळे निवडणुकीला अवकाश असला तरी राणा यांचा प्रचार आता चिन्हाच्या आधारावर सुरू होणार आहे. चिन्ह मिळाल्यानंतर राणा आणि पाना असे यमक जुळवित युवा स्वाभिमान पार्टीकडून नक्कीच प्रचार केला जाईल. राणा विरोधकही याच यमकाचा फायदा घेतील या शंकाच नाही. त्यामुळे अमरावतीमधील राजकीय प्रचारात ‘राणा और उनका पाना’ यावरून काही महिने काय काय ऐकायला मिळेल याचा नेम नाही. त्याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.

2019 मध्ये नवनीत राणा यांनी याच पाना चिन्हावर निवडणूक लढविली होती. त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पाठिंब्यासह राणा विजयी झाल्या होत्या. ‘सभी नटो का एकही पाना चुनके लाओ नवनीत राणा’ असा प्रचार त्यावेळी करण्यात आला होता. प्रचारातील हे वाक्य चांगलंच गाजलं होतं. 2024 मध्ये नवनीत राणा भाजपमध्ये गेल्या. त्यांच्या मागेमागे आमदार रवी राणा हे देखील भाजपमध्ये जातील, अशी शक्यता होती. मात्र तसे झाले नाही. राजकारणाच्या ‘हायवे’वर राणा यांच्या वाहनात बिघाड निर्माण करू पाहणाऱ्यांचे ‘नटबोल्ट टाइट’ करण्यासाठी राणा यांनी आपलं स्वतंत्र गॅरेज कायम ठेवलं. आता निवडणुकीसाठी ते पानाही वापरणार आहेत.

Ravi Rana : ..तर नवनीत राणा केंद्रीय मंत्री असत्या

आपल्या भिडूची बॅट

अमरावतीच्या लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू (Bacchu Kadu) विरुद्ध राणा दाम्पत्य असा सामना रंगला. त्याच बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पार्टीला बॅट चिन्ह मिळालं आहे. लोकसभा निवडणुकीत कडू यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात दिनेश बूब यांना उमेदवारी दिली होती. राणा आणि कडू यांच्यामधील संबंध कधीच मधूर राहिले नाही. ना महाविकास आघाडीत ना महायुतीत. मात्र बच्चू कडूंची बॅट लाकडी असल्याने त्यावर राणांचा पाना काम करेल का, असा प्रश्न आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!