महाराष्ट्र

Buldhana : कृष्णाच्या मारेकऱ्यांची नार्को टेस्ट करा!

Shiv Sena : आमदार नितीन देशमुख यांची मागणी; अपहरण व खून प्रकरण

Murder बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवसात दोन लहान मुलांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील नागझरी येथील कृष्णा राजेश्वर कराळे या विद्यार्थ्याच्या हत्येनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोन दिवसांमध्ये अशा दोन घटना घडल्यामुळे जिल्ह्यात भीतीचं वातावरण आहे. अश्यात पोलिसांना अजूनही आरोपींनी हत्येचे कारण सांगितले नाही. त्यामुळे शिवसेना (उबाठा) गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे.

बुलढाणाच्या नागझरी येथील 14 वर्षांच्या कृष्णाचं अपहरण झालं होतं. ट्युशन आणि शाळेसाठी बाहेर पडलेला कृष्णा घरी परतला नसल्याने शेगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान कृष्णाचा मृतदेह भास्तन येथील जंगलात आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी नातेवाईकांमध्ये मोठा आक्रोश पाहायला मिळाला.

शेगाव तालुक्यातील नागझरी येथील 14 वर्षीय कृष्णा राजेश्वर कराळे हा 23 जुलैपासून बेपत्ता झाला होता. हा मुलगा मंगळवारी सकाळी 10 वाजता शिकवणी वर्ग व शाळेला गेला होता. सायंकाळपर्यंत तो परतला नाही म्हणून घरच्यांनी शोधाशोध केली. अखेर त्याचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली होती. कृष्णा बुरुंगले विद्यालयात आठवीत शिक्षण घेत होता. अश्यात 23 जुलै रोजी सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी कृष्णाला एक संशयित मोटारसायकलवरून घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले होते. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. संशयिताच्या मोबाईलचे लोकेशन घेण्यात आले.

Amol Mitkari : हल्ल्यानंतर आईची प्रकृती बिघडली

आरोपी रुपेश वारोकार (22, रा. नागझरी) याला 24 जुलै रोजी सायंकाळी जळगाव जामोद येथे ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशी केली असता अपहरण झालेल्या कृष्णाची हत्याच झाल्याची माहिती समोर आली. हत्येच्या कटात पृथ्वीराज मोरे (21, रा. नागझरी) हा देखील सहभागी असल्याचे आरोपीने सांगितल्याने त्याला देखील अटक करण्यात आली आहे. मृत कृष्णाच्या शेजारचाच रुपेश वारोकार हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. भास्तनच्या जंगलात कृष्णाचा मृतदेह आढळून आला. जवळच त्याची स्कूल बॅगही पडलेली होती. तसेच लोखंडी हतोडासुद्धा आढळून आला होता.

एक आठवडा लोटला तरी

या प्रकरणात आठवडा उलटला तरी अद्याप कृष्णाच्या हत्येचे ठोस कारण पोलिसांना समोर आणता आले नाही. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. कृष्णाची गुप्तधनासाठी बळी दिली गेल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. पण पोलिसांनी या घटनेबाबत स्पष्टता दिलेली नाही. बुधवारी शिवसेना उभाठा गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला भेट दिली यावेळी त्यांनी ठाणेदार नितीन पाटील यांच्याशी चर्चा केली. व आरोपी खरे कारण सांगत नसतील तर त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी आपण केल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!