Shiv Sena : विधानसभा निवडणुकीच्या राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. एका पाठोपाठ एक उमेदवार जाहीर होत आहेत. जवळपास सर्वच पक्षांकडून उमेदवारी जाहीर करण्यात येत आहेत. महाविकास आघाडीच्या एकाही घटकपक्षाने आतापर्यंत उमेदवार जाहीर केले नव्हते. अखेर 23 ऑक्टोबर रोजी शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत 65 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.
वाद सुरू
उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात झाली आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ठाकरे गटाने जाहिर केलेल्या यादीत अकोला जिल्ह्यातील बाळापूर आणि अकोला पूर्व या मतदारसंघाचा समावेश आहे. दहिसर विधानसभा जागेबाबत माजी आमदार विनोद घोसाळकर आणि सून तेजस्विनी अभिषेक घोसाळकर यांच्यात वाद सुरू आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी दहिसर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी रोखली आहे. महाविकास आघाडीच्या 85-85-85 जागांचे वाटप पूर्ण झाले आहे. आता 18 जागांवर चर्चा करणार आहोत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. महाविकास आघाडीची बैठक झाल्यानंतर राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते.
दिघे विरुद्ध एकनाथ शिंदे !
कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या उमेदवारी यादीत 65 जणांना तिकीट देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासह दिग्गजांचा यामध्ये समावेश आहे.
मुंबईतील 13 मतदारसंघांतील उमेदवार शिवसेना ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाने 15 पैकी 14 आमदारांना पुन्हा एकदा पहिल्या यादीमध्ये स्थान दिलं आहे. मात्र, शिवडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अजय चौधरी यांना अजूनही वेटिंगवर ठेवलं आहे. त्यामुळे शिवडी विधानसभा मतदारसंघात अजय चौधरी की सुधीर साळवी हा सस्पेन्स अजूनही कायम आहे.
अकोल्यातही ठरलं
अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघांपैकी महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला किती मतदारसंघ सुटतील, याबाबत चर्चा जोरात सुरू होती. अखेर बाळापूर आणि अकोला पूर्वची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत बाळापूर मधून विद्यमान आमदार नितीन देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अकोला पूर्व मतदार संघातून शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
बाळापुर आणि अकोला पूर्व या दोन्हीही मतदारसंघांत महाविकास आघाडीमध्ये जागांसाठी रस्सीखेच सुरू होती. मात्र आता या दोन्ही ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाने आपले उमेदवार जाहीर केले. काँग्रेसने या दोन्ही जागा सोडल्याचे आता स्पष्ट झाले आहे. गोपाल दातकर हे अकोला पूर्वकरिता 28 नोव्हेंबरला नामांकन अर्ज भरणार आहेत. तर बाळापुर मतदारसंघासाठी नितीन देशमुख 29 नोव्हेंबरला शक्ती प्रदर्शन करून नामांकन अर्ज भरणार आहे.