Shiv Sena : विदर्भातून अनेक नेते मुंबईच्या मंत्रालयात जातात. पण मी मुंबईत चौपाटीवर फिरायला जात नाही. पर्यटनासाठी जात नाही. एसी हॉटेलमध्ये झोपा काढायला जात नाही, असे नमूद करीत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी निधी खेचून आणण्याची ‘निंजा टेक्निक’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमक्ष सांगितली. 547 कोटी रुपयांच्या आठ विकास कामांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (ता. 24) भंडाऱ्यात भूमिपूजन केले. यावेळी आमदार भोंडेकर यांनी ते मुंबईत कशासाठी जातात याचे गुपित सांगितले.
मंत्रालयातून निधी खेचून आणणे सोपे नाही. पायाला भिंगरी लाऊन फिरावे लागते. केवळ चौपाटीवर फिरून किंवा हॉटेलमध्ये झोपून हा निधी भेट नाही. त्यासाठी परिश्रम करावे लागतात. हे परिश्रम आपण करीत आहोत, असे आमदार भोंडेकर म्हणाले. भंडारा जिल्ह्याला भरघोस निधी दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. भंडाऱ्याचा विकास व्हावा ही सर्वांची इच्छा आहे. यासाठी आपण प्रयत्न करीत आहे. त्यासाठी निधीचा ओघ कायमच ठेवावा लागणार आहे. हा निधी अव्याहतपणे मिळत राहिल, अशी अपेक्षाही भोंडेकर यांनी व्यक्त केली.
शिवसेना स्टाइल दम
आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विरोधकांना शिवसेना स्टाइलने दम भरला. विकासाच्या कामात आडवे येऊ नका असा सूचक इशाराच त्यांनी विरोधकांना दिला. विकासाच्या कामात सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन देखील त्यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात आमदार नरेंद्र भोंडेकर यांची तोंडभरून स्तुती केली. भोंडेकर किती चांगल्याप्रकारे काम करीत आहे, याचा पाढा मुख्यमंत्री शिंदे यांनी वाचला. भोंडेकर सतत विकासाच्या मुद्द्यावर सतत आग्रही असतात असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या स्तुतीमुळे शिंदे गटात भोंडेकर यांचे वजन आणखी वाढले आहे.
Bhandara News : प्रकल्पग्रस्तांच्या आक्रमक भूमिकेमुळे शिंदेंच्या कार्यक्रमात गोंधळ
रेड्डी मंचावर, जयस्वाल गायब
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात रामटेकचे भाजप आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. रेड्डी यांच्या उपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. अशातच रामटेकचे शिंदे गटाचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल हे मात्र व्यासपीठावर दिसले नाही. त्यामुळे रामटेकमध्ये नेमके कोणते राजकारण शिजत आहे, असा प्रश्न अनेकांना पडला. रेड्डी यांची उपस्थिती आणि जयस्वाल यांची अनुपस्थिती सभास्थळी चर्चेचा विषय होती. रेड्डी शिंदे गटात येणार की काय, अशी कुजबूज देखील यावेळी ऐकायला मिळाली. शिंदेंच्या कार्यक्रमाला महायुतीमधील अनेक नेत्यांनी दांडी मारली. पण रेड्डी आणि शिंदे एकाच व्यासपीठावर आल्याने कोण कशासाठी ‘रेडी’ हात आहे, यासंदर्भातील तर्कवितर्क लावले जात आहेत.