Demand For Betterment : भंडारा जिल्ह्यात बांधकाम कामगार नोंदणीमध्ये येत असलेल्या अडचणींना लक्ष्यात घेत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांची भेट घेतली. कामगारांची नोंदणी ही नगर पंचायत व पंचायत समितीस्तरावर गट विकास अधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. भेटीदरम्यान आमदार भोंडेकर यांनी कामगदार मंत्र्यांना निवेदनही दिले. निवेदनावर सकारात्मक विचार करून तत्काळ निर्णय घेण्याचे आश्वासन कामगार मंत्र्यांनी दिले.
मुंबई येथे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे (Shiv Sena) आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांची भेट घेतली. कामगारांच्या समस्या त्यांनी खाडे यांच्या समोर मांडल्या. भोंडेकर त्यांना माहिती देताना म्हणाले की, शासनातर्फे चालविण्यात येत असलेली योजना ही कामगारांसाठी अत्यंत उपयोगी ठरत आहे. या योजनेच्या लाभ घेण्यासाठी अनेक श्रमिक कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयामार्फत नोंदणी करीत आहेत. भंडारा जिल्ह्यात कामगारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या योजनेत नोंदणी करताना कामगारांना अडचणींना सामोरी जावे लागत आहे. संबंधित कार्यालयात मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे अनेक कामगारांची नोंदणी होऊ शकलेली नाही. अशात ते सरकारी योजनेपासून वंचित होऊ शकतात.
ग्रामीण भागाचा प्रश्न
भंडाऱ्यातील ग्रामीण क्षेत्रातील कामगारांना नोंदणीकरिता जिल्हा मुख्यालयात यावे लागत आहे. ज्यामुळे गरीब कामगारांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. योजनेचा लाभ अधिक कामगारांना व्हावा यादृष्टीने नोंदणी प्रक्रिया वेगाने करणे गरजेचे आहे. नगर पंचायत व पंचायत समितीस्तरावर गट विकास अधिकाऱ्यांमार्फत नोंदणी मोहिम राबविण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी कामगार मंत्र्यांना दिले आहे. ज्या कामगारांची नोंदणी झाली आहे, त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. असे प्रलंबित अर्ज असतील तर त्यावर तत्काळ निर्णय घेण्यात यावरा, अशी मागणीही आमदार भोंडेकर यांनी निवेदनात केली आहे.
राज्यातील सर्व कामगारांना योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये सर्व प्रकारच्या कामगार नोंदणीसाठी कामगार सेतू नोंदणी केंद्र, नाक्यावरील कामगारांकरीता कामगार निवारा केंद्र उभारण्यात येणार होते. कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी यासंदर्भात पुण्यात घोषणा केली होती. कामगारांना आरोग्यविषयक सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळण्यासाठी राज्यात सहा मल्टीस्पेशालटी रुग्णालय उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. कामगारांचा अपघात झाल्यावर त्यांचा कुटुंबाला आर्थिक मदत मिळण्यासाठी विमा कंपनीबाबत योजनाही तयार आहे. सुरक्षा मंडळातील कर्मचारी, अर्धवेळ काम करणाऱ्या कामगाराला एक हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. त्याचा लाभ कामगारांना मिळावा, अशी मागणही आमदार भोंडेकर यांनी केली.