Statement On Name Of CM : यशवंतराव चव्हाण व त्यांच्या नंतरच्या मुख्यमंत्र्यांच्या अथक प्रयत्नांनी महाराष्ट्र घडला. आता महाराष्ट्र समृद्ध झाला. परंतु भाजपप्रणित महायुती सरकारने हा समृद्ध महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण, गरीब व सर्व जातीधर्माच्या लोकांना न्याय देणे ही काँग्रेसची भूमिका आहे. महाविकास आघाडी म्हणून विधानसभेच्या निवडणुकीला तीनही पक्ष सामोरे जाणार आहोत. निवडणुकीनंतर सर्वसहमतीने मुख्यमंत्री पदासाठी नाव ठरविण्यात येईल. महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्रालर वाचविणे ही काँग्रेसची प्राथमिकता आहे, असे विधान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केले.
उपराजधानी नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, महाभ्रष्ट युती सरकारने मुंबईसह महाराष्ट्र विकायला काढला आहे. अदानीला महत्वाच्या जमिनी कवडीमोल भावाने दिल्या जात आहेत. फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचाच लिलाव सुरू करण्यात आला आहे. भाजप सरकारने दिल्लीतील लाल किल्लाही त्यांच्या बगलबच्च्यांना देऊन टाकला आहे. फक्त शनिवारवाडा आणि आगाखान पॅलेसच नव्हे तर संपूर्ण राज्याचा लिलाव सरकारने करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्राची लूट सुरू आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
मध्यमवर्गीय असुरक्षित
मध्यमवर्गातील लोकही मागील काही वर्षांपासून मोठ्या संख्येने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात. पण त्यांचा पैसाही सुरक्षित नाही. सेबीचे अध्यक्ष, अदानी व त्यांच्यामागे पंतप्रधान अशा प्रकारचे चित्र दिसत आहे. हिंडनबर्ग अहवाल व सेबी प्रमुखांच्या मुद्द्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, ही भ्रष्ट यंत्रणा केंद्र सरकारने निर्माण केली आहे. त्यामुळे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अदानींच्या कंपन्यांमध्ये 20 हजार कोटी रुपये कोणाचे आहेत? असा प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर नरेंद्र मोदी (Narendra Modi) देऊ शकले नाहीत. सुप्रीम कोर्टानेही सेबीच्या प्रमुखाला, तुम्ही काय झोपले होते का? असा प्रश्न केला होता. पण सेबीचे प्रमुखच यात सामिल आहेत. याचाच अर्थ भ्रष्टाचाराची पाळेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आसपास फिरत आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले.
अटल सेतूप्रकरणी दंड
काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी अटल सेतुला खड्डे पडल्याचे उघडकीस आणले होते. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले होते. याप्रकरणातील स्ट्रॉबॅग या कंत्राटदाराला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही माहिती एमएमआरडीए प्रशासनाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली आहे. त्यांनी यासंदर्भात आरटीआय अर्ज दाखल केला होता. एमएमआरडीएने केलेलया कारवाईमुळे या प्रकरणाची पुन्हा चर्चा होणार आहे. जून 2024 मधील तिसऱ्या आठवड्यात करण्यात आलेल्या निरीक्षणादरम्यान पुलाच्या रॅम्प पाचला जोडणाऱ्या तात्पुरत्या रस्त्याला काही छोट्या भेगा आढळून आल्याचे उत्तर एमएमआरडीएने दिले आहे. या पुलाचा मुख्य भाग नसल्याचेही नमूद आहे. यासंदर्भात स्ट्रॉबॅग या कंपनीस कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.