Political war : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यातील वाद थांबायचे काही नाव घेत नाही. जळगाव जिल्ह्यातील भाजपचे सर्व नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना लक्ष्य करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आताही भाजप प्रवेशावरून चाळीसगावचे आमदार चव्हाण यांनी जिव्हारी लागणारी टीका केली आहे.
पक्षप्रवेशाला पूर्णविराम..
राष्ट्रवादी काँग्रेस सोडलीच नाही तर भाजप प्रवेशाचा प्रश्न कुठे येतो, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना नुकताच पूर्णविराम दिला. जळगावात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात खडसेंनी हे भाष्य केलं. मात्र खडसेंच्या भूमिकेवरून राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत. भाजपचे मंत्री गिरीश महाजन तर खडसेंवर बोलण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र आता त्यांचे जुने वैरी आमदार मंगेश चव्हाण यांनी ‘त्यांचं वय झालंय, बुड्ढा सठिया गया’ या शब्दात टीका केली आहे.
राज्याच्या राजकारणात एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावरून चांगलीच चर्चा होत आहे. दरम्यान, भाजप प्रवेशाच्या चर्चांवर खुद्द एकनाथ खडसे यांनी भाष्य करत पूर्णविराम दिला. यावरूनच भाजप आमदाराने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘एकनाथ खडसे हे केवळ प्रसिद्धीसाठी खालच्या पातळीवरील आणि हीन दर्जाचे आरोप करत असतात’, असं वक्तव्य आमदार मंगेश चव्हाण यांनी केलं. पुढे मंगेश चव्हाण असेही म्हणाले की, ‘सध्या ते अनेक ठिकाणी हातपाय मारत आहेत. मात्र कुठेही त्यांना यश मिळालेलं नाही. जनता त्यांना नाकारत आहे. अपक्ष माणसाने त्यांचा पराभव केल्याचं आपण बघितलं.’
Reservation : आरक्षण संदर्भातील निकाल मूलभूत संरचनेच्या विरोधात
वय झालं तरी राजकारण
‘एकनाथ खडसे यांचं वय झालं आहे. बुड्ढा सठिया गया,’ असे म्हणत खोचक टीकाही मंगेश चव्हाण यांनी केली. यासर्व प्रकरणातून भाजपचे आमदार मंगेश चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्यातील शाब्दिक संघर्ष पुन्हा एकदा टोकाला गेला आहे.
यापूर्वीही चव्हाणांची घसरली होती जीभ!
यापूर्वी एकनाथ खडसे यांनी ‘भंगार विक्री करणारा’ असा चव्हाण यांचा एकेरी उल्लेख केला होता. या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्यावर विखारी हल्ला केला होता. एकनाथ खडसे यांचा बाप तोंडात काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला होता का? अशा शब्दात आमदार चव्हाण यांनी टीका केली होती .