Political Support : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी येथे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. कपिल पाटील यांचा पक्ष महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. तरीही त्यांनी आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केल्याने महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभेचे मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत तर दुसऱ्या टप्प्यात अकोला लोकसभा मतदारसंघात निवडणूक पार पडणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचाराने जोर पकडला आहे. वेगवेगळ्या पक्ष संघटनांकडून उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे. शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांनी अकोला येथील प्रकाश आंबेडकर यांच्या यशवंत निवासस्थानी भेट घेऊन पाठिंबा दिला आहे. कपिल पाटील यांचा समाजवादी गणराज्य पक्ष सध्या महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. त्यांनी आज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केल्याने महाविकास आघाडीला धक्का मानला जात आहे. तर महाविकास आघाडीतील मतभेद उघडपणे बाहेर आल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेताना यावेळी कपिल पाटील यांच्यासोबत समाजवादी गणराज्य पार्टीचे महासचिव अतुल देशमुख, प्रदेशाध्यक्ष अजित शिंदे, अकोला जिल्हाध्यक्ष जिब्राईल दिवाण, माजी महापौर रऊफ पैलवान, औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष प्रकाश दाणे, अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष भीमराव कोरटकर, अमरावती जिल्हा संपर्क सचिव योगेश निंभोरकर, पार्टीचे सचिव सचिन बनसोडे, विनय खेडेकर आणि अकोला परिसरातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
कोण आहेत कपिल पाटील!
आमदार कपिल पाटील हे राज्यातील अभ्यासू आमदारांपैकी एक आहेत. मुंबई शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेल्या पाटील यांचा व्यासंग मोठा आहे. समाजसेवक, पत्रकार आणि राजकारणी असा त्यांचा प्रवास राहिला आहे. समाजवादी विचारांचा साथी, शिक्षकांसाठी भांडणारा नेता, अभिनव पद्धतीने आंदोलन करणारा नेता, पुरोगामी चळवळीचा दुवा अशी त्यांची ओळख आहे. महिन्याभरपूर्वी जनता दल (संयुक्त)चे प्रमुख नितीशकुमारांना इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करणाऱ्या आमदार कपिल पाटील यांनी पक्षाच्या महासचिवपदाचा राजीनामा दिला. नितीशकुमारांची साथ सोडल्यानंतर आता कपिल पाटलांनी त्यांच्या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली आहे. समाजवादी गणराज्य पार्टी असे पाटलांच्या नव्या पक्षाचे नाव असून ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. सध्या कपिल पाटील यांचा पक्ष महाविकास आघाडीचा घटकपक्ष आहे.