Maharashtra Politics : ‘भलेही माझी पक्षातून हकालपट्टी करा, पण तत्पूर्वी मी कुणाला मतदान केले हे तपासून बघा’, असे नमूद करीत काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी आरोप फेटाळले आहेत. खोसकर यांनी स्वतः माध्यमांपुढे येत आपण पक्षाच्या सूचनेनुसार मतदान केल्याचा दावा केला आहे. त्यांचे नाव ‘क्रॉस व्होटिंग’ करणाऱ्या काँग्रेस आमदारांच्या यादीत आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी असा अहवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिल्लीला पाठविला आहे. त्यानंतर खोसकर यांनी आपली बाजू मांडली.
पक्षश्रेष्ठी व इतर नेत्यांनी या प्रकरणी माझी नाहक बदनामी थांबवावी. जे खरेच फुटलेत त्यांच्यावर कारवाई करावी. कोणत्या आमदाराने कुणाला मतदान करायचे हे पक्षाने आधीच ठरवले होते. काँग्रेसची सात मते मिलिंद नार्वेकरांना आणि उर्वरित मते शेकापच्या जयंत पाटलांना द्यायचे ठरले होते. त्या पद्धतीने नाना पटोले, कैलास गोरंट्या आम्ही सगळे गेलो. एकत्र जाऊन मतदान केले, असे खोसकर यांनी सांगितले.
योग्य मतदान केले
‘मी पहिल्या पसंतीचे मतदान मिलिंद नार्वेकरांना केले. त्यानंतर जयंत पाटील व प्रज्ञा सातव यांना दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीची मते दिली. मी व्यवस्थित मतदान केले.’ उद्धव ठाकरे यांचे 16 व आमचे 7 अशी 23 मते होतात. आता एक मत कुणाचे फुटले हे कोर्टाकडून आदेश घेऊन तपासून घ्यावे. माझी माध्यमांत बदनामी सुरू आहे. वरिष्ठांनी त्याची दखल घेऊन ती तातडीने थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली. मी व्यवस्थित मतदान केले. त्यानंतरही माझी बदनामी सुरू असणारी बदनामी चुकीची आहे. जे फुटलेत त्यांच्यावर कारवाई करण्याची त्यांची ताकद नाही, असेही खोसकर यांनी म्हटले.
विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या सात आमदारांची अखेर काँग्रेसला ओळख पटवण्यात यश आले आहे. त्यात मराठवाड्यातील तीन, उत्तर महाराष्ट्रातील दोन, मुंबई व विदर्भातील प्रत्येकी एका आमदाराचा समावेश आहे. त्यांच्यावर आठवड्याभरात कारवाई होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने याबाबतचा अहवाल दिल्लीला पाठविला आहे. झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके, शिरीष चौधरी, हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकर, मोहन हंबिर्डे यांची नावे त्यात आहेत. ही नावे बाहेर आल्यानंतर खोसकर यांनी आपली बाजू मांडली आहे.
जे फुटलेत त्यांच्यावर कारवाई करण्याची त्यांची ताकद नाही, असे खोसकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांचा रोख कोणाकडे आहे अशी चर्चा आहे. आमदार फुटल्याने सध्या महाराष्ट्रात काँग्रेसवर आरोप होत आहे. वंचित बहुजन आघाडीने तर महाराष्ट्र काँग्रेस भाजपचा ‘स्लीपर सेल’ असल्याचा थेट आरोप केला आहे. त्यामुळे फुटलेले आमदार शोधण्याचे आव्हान काँग्रेसपुढे आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्याविरुद्ध कारवाई देखील काँग्रेसला करावीच लागणार आहे.