महाराष्ट्र

Amol Mitkari : आमदार भुयार यांचा यूटर्न; मिटकरींनीही दिली साथ!

Devendra Bhuyar : महिलांबाबत केलेल्या 'त्या' वक्तव्याचा विपर्यास; मिटकरींचा दावा!

अमरावती जिल्ह्यातील आमदार देवेंद्र भुयार यांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी निशाणा साधला आहे. भुयार यांनी ‘चांगली मुलगी नोकरीवाल्याला, दोन नंबरची दुकानदाराला, तीन नंबरचा गाळ शेतकऱ्याचा गळ्यात, असे वक्तव्य केले. नोकरी नसलेल्या, शेतकरी मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे. मुंबई, पुण्यात नोकरी असणाऱ्या मुलांना विवाहासाठी मागणी वाढत आहे.’ या वक्तव्याचा व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पोस्ट केला आहे. दरम्यान या वक्तव्यावरून आमदार देवेंद्र भुयार यांनी यूटर्न घेतला आहे. तर आमदार अमोल मिटकरींनी भुयार यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण चांगलच तापलं आहे. वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अजित पवार यांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी केलेल्या एका वक्तव्याच्या व्हायरल व्हिडिओची सध्या चर्चा सुरू आहे. आमदार देवेंद्र भुयार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. आमदार भुयार यांनी, ‘मुलगी जर दिसायला चांगली असेल तर ती तुमच्या माझ्या सारख्यांना भेटत नाही, तर ती नोकरीवाल्या मुलाला भेटते. दोन नंबरची मुलगी कोणाला मिळते, ज्यांचा धंदा आहे, पानटपरी, किराणाचे दुकान आहे अशा मुलांना मिळते. तीन नंबरचा राहिलेला गाळ आहे. त्या मुली शेतकऱ्यांच्या मुलांना मिळते.’ पुढे ते असेही म्हणाले, शेतकऱ्याच्या मुलांचं काही खरं राहिलेलं नाही. जन्माला येणारं लेकरूसुद्धा हेबाळ निघतं. माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी वाणराचे पिल्लू असाच कार्यक्रम आहे सगळं..”, असं महिलांच्या दिसण्यावरून आमदार देवेंद्र भुयार यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

भुयार यांनी केलेल्या या वक्तव्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देवेंद्र भुयार यांची पाठराखण केली आहे. विरोधकांकडून जाणीवपूर्वक बदनाम करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर आमदार भुयार यांनीही आपला व्हिडिओ 2019 मधला असल्याचं म्हणत यूटर्न घेतला आहे.

भुयार काय म्हणाले?

वरुड मोर्शीचे अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान भुयार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला. लग्नासाठी मुलींना नोकरी करणारा मुलगा हवा असतो. शेतात राबणारा शेतकरी आहे मात्र शेतकऱ्याला निसर्ग साथ देत नाही. बाजार भाव शेतकऱ्याला मिळत नाही, असं भुयार यांनी म्हटलं आहे. तर त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुला मुलीचे लग्न होण्यास अडथळा निर्माण होतो. शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न झाल्यावर काय अवस्था होते, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. 2019 मधला जुना व्हिडिओ काढून यात मी महिलांचा दोषी आहे असा भासवण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांचा असल्याच त्यांनी म्हटलं आहे.

MLA Devendra Bhuyar : दादांच्या समर्थक आमदारांचं महिलांविषयी वादग्रस्त विधान

महिलांचा कायम सन्मान

मी महिलांचा कायम सन्मान केला आहे. माझ्या मतदारसंघातील महिला माझा सन्मान करतात. निवडणुकीचा तोंडावर माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न राजकीय पुढार्‍यांनी केला. माझ्या अशा वक्तव्याने कुणाचं मन दुखावलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझा उद्देश कुणाला दुखावण्याचा नव्हता शेतकऱ्यांची खरी परिस्थिती व्यक्त केली होती, असं त्यांनी म्हटलं आहे.

आमदार मिटकरींकडून पाठराखण!

मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांची पाठराखण केली आहे. सध्या ग्रामीण भागात शेतकरी मुलांच्या लग्नाचा विषय बिकट असून शेतकरी पुत्रांचा विवाह होत नसल्याने देवेंद्र भुयार यांनी वास्तविक परिस्थिती मांडली असल्याचं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. विदर्भातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. ही वस्तुस्थिती त्यांनी त्यांच्या स्टाईल मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचं मिटकरींनी म्हटलं आहे. देवेंद्र भुयार इतकं वादग्रस्त बोलले नसल्याचं मिटकरी म्हणाले. हे केवळ जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं विरोधकांचं षडयंत्र असल्याचं मिटकरींनी म्हटलं आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!