महाराष्ट्र

Lok Sabha Election : राणांना तिकिट देताच बच्चू कडूंचा ‘प्रहार’

Amravati Constituency: भाजप, काँग्रेसनंतर उमेदवार देत नवनीत राणांना आव्हान

MLA bacchu Kadu : अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाकडून विद्यमान खासदार नवनीत राणा, काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का देत शिवसेनेचे नेते दिनेश बुब यांनी बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश केला आहे. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे बच्चू कडू यांनी महायुतीमध्ये असताना सुद्धा नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचा उमेदवार उभा करून महायुतीलाच आव्हान दिले आहे.

महायुतीकडून (Mahayuti) खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नये, यासाठीच बच्चू कडू यांनी महायुतीकडे आग्रह धरला होता. त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन वेळा बच्चू कडू यांच्या बैठकीसुद्धा झाल्या. आम्हाला खोके सरकार म्हणणारे, भाजपचे कार्यालय फोडणारे, भाजपच्या पालकमंत्र्यांना बालक मंत्री म्हणणारे, घरात येऊन मारण्याची भाषा करणाऱ्यांना उमेदवारी देऊ नये. आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही अशी थेट भूमिका बच्चू कडू यांनी घेतली होती. मात्र अखेर भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाल्यानंतर बच्चू कडू यांनी आपले दंड थोपाटले आहे.

ब्रह्मदेव जरी आला तरी नवनीत राणा विजय होऊ शकणार नाही तशी व्यूहरचना आम्ही रचली आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. नवनीत राणा यांना भाजपा कडून तिकीट मिळाल्यानंतर आमदार रवी राणा यांनी सर्व महायुतीतील पक्षातील नेत्यांना मी हात जोडून विनंती करतो की त्यांनी मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकत्र यावे व नवनीत राणा यांचा प्रचार करावा. अशी विनवणी करत रवि राणा पाहायला मिळाले, सोबतच नवनीत राणा यांनी सुद्धा घटक पक्षातील लोकांनी साथ द्यावी अशी विनवणी केली आहे. दुसरीकडे नवनीत राणा यांच्या विरोधात कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी सुद्धा नवनीत राणा यांना विरोध करत महायुतीने राणा यांना उमेदवारी दिली असली तरी आपण अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची ठाम भूमिका घेतली आहे. राणा आता जरी हसताना दिसले तरी शेवटच्या दिवशी गेम झालेला दिसेल, असे सूचक वक्तव्य कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी केले.

सामूहिक विरोध

जिल्ह्यातील सर्व राजकीय नेत्यांनी टोकाची भूमिका घेत नाही. मात्र 90 टक्के लोकांनी हा मिळून निर्णय घेतलेला आहे, की दिनेश बुब हे प्रहारकडून निवडणूक लढवतील. सामान्य जनतेनेसुद्धा तिसरा पर्याय मागितला होता. त्यामुळे तिसरा पर्याय म्हणून उमेदवारी आहे. नवनीत राणा जर निवडणुकीच्या रिंगणात राहतील तर दिनेश बुब हे निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार राहतील असे शिवसेनेचे नेते माजी खासदार अनंतराव गुढे यांनी म्हटले ते. आम्ही त्याचं पालन करत आहोत. शिवसेनेचे दोन्ही गट आमच्यासोबत आहे अशी प्रतिक्रिया प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांनी दिली.

अमरावती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत दुहेरी लढत होईल असे चित्र पाहायला मिळत होते. मात्र बच्चू कडू यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर आता अमरावती लोकसभा मतदारसंघाचे राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे.

आमदार बच्चू कडू यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेली बैठक सुद्धा निष्फळ ठरली. अखेर त्यांनी आपला उमेदवार जाहीर केला. दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ हे सुद्धा आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत. त्यामुळे महायुतीतील दोन दिग्गज नेते महायुतीमध्ये राहूनच महायुतीच्या उमेदवारांना एक प्रकारे आव्हान देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खासदार नवनीत राणा यांना काँग्रेसपेक्षा महायुतीच्या उमेदवारांचा सामना करावा लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!