महाराष्ट्र

Reservation : नरहरी झिरवळ यांचं मिटकरींकडून समर्थन!

Narhari zirwal  : आरक्षण देण्यास विरोध

Dhangar Community : राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. अशात धनगर समाजानेही आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी यासंदर्भात एक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्यास आमची हरकत नाही. पण आमच्यामधून त्यांना आरक्षण का? धनगर समाजाला आदिवासीतूनच आरक्षण देण्याचा हट्ट का? असा सवाल नरहरी झिरवाळ यांनी केला आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी झिरवळ यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.

आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापण्याची शक्यता

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे ओबीसींकडूनही आंदोलन केले जात आहे. अशातच धनगर समाजाकडून एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी करण्यात येत होती. धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश करावा, या मागणीसाठी आठ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘धनगर समाजाला आरक्षण द्यावे याबाबत आमचे दुमत नाही. पण आदिवासीतून देऊ नये असं झिरवळ यांनी म्हटलं आहे. आदिवासींमधूनच आरक्षण हवे, असा हट्ट का? हा हट्ट योग्य नाही. कालच्या बैठकीची मला कल्पना दिली नाही. सरकारने जसे त्यांना बोलवलं तसं आम्हालाही बोलावलं पाहिजे. मी विधानसभेचा उपाध्यक्ष असल्याने समाजाचे माझ्याकडे लक्ष आहे. सरकारच्या निर्णया विरोधात आदिवासी आमदार, नेते, संघटना सर्व एकत्र येतील. सर्व आदिवासी नेत्यांची बैठक घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करणार आहे. विरोध करायचा की न्याय मागायचा हा निर्णय घेतला जाणार आहे,’ असंही नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केलं.

तर दुसरीकडे झिरवळ यांच्या या वक्तव्याचा धनगर आरक्षणासाठी उपोषण करणारे दीपक बोराडे यांनी तीव्र विरोध केला आहे. झिरवळ यांचा बोलावता धनी दुसरा कोणीतरी आहे. नुसते जात प्रेम आहे म्हणून धनगरांना खेटू नका. ध्यानात ठेवा धनगराशी वाकडं, तर नदीत लाकडं, असा इशाराच दीपक बोराडे यांनी झिरवळ दिला आहे.

Akola : काँग्रेसमध्ये झाली इच्छुकांची गर्दी!

मिटकरींचे समर्थन 

नरहरी झिरवाळ यांनी केलेल्या वक्तव्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी समर्थन केले आहे. आमदार मिटकरी यांनी झिरवळ यांचं म्हणणं रास्त असल्याचं म्हटलं आहे. आमदार मिटकरींनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘नरहरी झिरवळ स्वतः आदिवासींचे प्रश्न मांडत आहेत. आणि त्यांचा म्हणणं रास्त आहे. मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला आरक्षण द्यावं मात्र आदिवासी समाजावरही अन्याय होणार नाही याचीही काळजी घ्यावी.’ पुढच्या बैठकीत आदिवासी समाजातील नरहरी झिरवळ किंवा इतर नेत्यांना बोलावून मार्ग काढावा असा सल्लाही मिटकरी यांनी दिलाय.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!