Oriental Insurance Company : शेतकऱ्यांची पीके संरक्षित करण्याच्या उद्देशने पीक विमा योजना सरकारने आणली. शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा काढून दिला. पण ओरिएंटल इन्शूरन्स कंपनीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देताना अनेक अडचणी निर्माण केल्या. अखेर अटक करण्याचा इशारा दिला तेव्हा कुठे शेतकऱ्यांना विम्याचे क्लेम मिळाले, अशी माहिती राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मुनगंटीवार यांच्या दणक्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येण्याचा मार्ग मोकळा झाला.
शेतकरी पीक विमा योजना, ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. दुर्दैवाने विमा कंपन्यांच्या आडमुठेपणामुळे आजवर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पण यावेळी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा मुद्दा लाऊन धरला. आता ३१ ऑगस्टपर्यंत विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे.
सोमवारी (ता. १२) मंत्री मुनगंटीवार यांनी या प्रक्रियेचा प्रवास सांगितला. शेवटच्या व्यक्तीपर्यंत राज्याच्या तिजोरीतील त्यांच्या हक्काचा निधी पोहोचला पाहिजे, अशा योजना राज्य सरकारने सुरू केल्या. एक रुपयात पीक विमासारखी कल्याणकारी योजना आणली. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिस्याचे 1551 कोटी रुपये भरले. त्यांची पीके संरक्षीत केली.
ओरीएंटल इंशुरन्स कंपनीला चंद्रपूर आणि जिल्ह्याचे अधिकृत एजंट म्हणून नियुक्त केले. पण त्यांनी विम्याची रक्कम देताना अडचणी निर्माण केल्या. त्यावर तोडगा काढण्यासाठी 5 ऑगस्टला पहिली बैठक घेतली. त्याठिकाणी ओरीएंटल कंपनीचे लोकही होते. यावेळी कंपनीला गांभीर्य नाही, हे लक्षात आले. त्यानंतर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेत बैठक घेतली. आणि शेतकऱ्यांचे क्लेम दिले नाही, तर अटक करण्याची कारवाई करू, असा शेवटचा इशारा कंपनीला दिला. त्यानंतर कंपनीने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व क्लेम मंजूर करण्याची घोषणा केली, असे मुनगंटीवार म्हणाले.
10 ऑगस्टला पुन्हा बैठक घेतली. 202 कोटी 76 लाख 23 हजार 984 रुपयांचे सर्व क्लेम अदा करण्याचा निर्णय झाला. पीक विमा लागू झाल्यानंतरची ही सर्वांत मोठी रक्कम आहे, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. 86 हजार 658 शेतकऱ्यांनाही याचा फायदा झाला. ज्यांचे अपेक्षीत उत्पन्न झाले नाही, त्यांचेही क्लेम मंजूर झाले. ३१ ऑगस्टच्या पूर्वी हे वाटप होणार आहे, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा दीर्घ अभ्यासाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना असा झाला फायदा
म्हणे पाऊसच पडला नाही
20 हजार 95 शेतकऱ्यांचे क्लेम कंपनीने नाकारले गेले होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार तालुक्यामध्ये पाऊसच पडला नाही, असे तकलादू कारण देण्यात आले होते. पण आता त्यांनी त्या शेतकऱ्यांचे क्लेमसुद्धा मान्य केले आहेत, असे मुनगंटीवार म्हणाले. याशिवाय 1762 शेतकऱ्यांना क्रॉप मिसमॅच म्हटले होते, त्यांच्याही क्लेमला मान्यता देण्यात येणार आहे. 4668 क्लेम नाकारण्यात आले होते. ते सुद्धा व्हेरीफाय होणार आहेत. 8418 क्लेम स्क्रुटीनीमध्ये आहेत. यालासुद्धा व्हेरीफाय करण्याचे ओरीएंटल कंपनीने मान्य केले आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
कृषी महाविद्यालयाची निर्मिती
पहिला निर्णय कृषी महाविद्यालयाच्या संदर्भात घेतला. 100 एकरमध्ये सोमनाथला कृषी महाविद्यालय साकारत आहे. अजयपूरच्या 10 एकर जागेमध्ये पंजाब नॅशनल बॅंकेच्या सीएसआरमधून 15 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या महाविद्यालयात शॉर्ट टर्म ते सहा महिन्यांपर्यंतचे कोर्सेस शिकवले जातील. तिसरा निर्णय चीननंतर जगात भाजीपाला भारतात तयार होतो. जेवढी आवश्यक्ता आहे, तेवढा भाजीपाला आपल्या देशात होत नाही. आपली लोकसंख्या 141 कोटी आहे. तुलनेत भाजीपाला कमी होतो. भाजीपाल्याच्या 31.90 कोटी रुपये खर्च करून भाजीपाला केंद्र उभारले जाणार आहे. देशी वाणांची बॅंक तयार करण्याचाही निर्णय केला आहे, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.
रानभाज्यांच्या फुड कोर्टला मान्यता
याशिवाय 5 कोटी रुपयांच्या ट्रेनिंग सेंटरला मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील रानभाज्यांच्या फुड कोर्टलाही मान्यता दिली आहे. सोयाबीन कापूस दोन हेक्टरसाठी 10 हजार रुपयांची मदत देणार आहोत. भावांतर योजनेमधील अंतर देण्याचा निर्णय घेतला आहे. 20000 हेक्टरी धानाचा बोनस 156 कोटी 50 लक्ष 640 रुपयांचे वाटप होणार आहे.