Shinde group leader Arjun Khotkar : राज्य सरकारने अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यात महिला स्थानिक तहसील कार्यलयात गर्दी करत आहेत. यातून महिलांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे. या शिवाय वर्षाला 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणाही केली. मात्र या योजनांचा लाभ घेण्यासाठी माजी मंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी महिलांना अजब सल्ला दिला आहे. लाडकी बहीण आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या गॅस सिलेंडर योजनेचे लाभ घेण्यासाठी सासा-सुनांनी कागदोपत्री वेगवेगळं राहण्याचा अजब सल्ला अर्जुन खोतकर यांनी महिलांना दिलाय.
राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आहे. अशातच आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी एक अजब गजब सल्ला दिला आहे. त्यांचे विधान वादग्रस्त ठरत आहे. राज्यात ठिकठिकाणी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी महिलांची लगबग बघायला मिळत आहे. अशातच आता योजनेच्या लाभासाठी आणि योजनेत पात्र होण्यासाठी सासा-सुनांनी कागदोपत्री वेगवेगळं राहण्याचा अजब सल्ला माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिला आहे.
मंगळवारी (दि.३०) जालना येथे गायरान हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती होती. यावेळी केलेल्या भाषणात खोतकरांनी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना उद्देशून हा सल्ला दिलाय. ‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत तेव्हापासून त्यांनी धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडकी बहीणी’ झाल्या आहात. तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत. तुम्हाला तीन गॅस सिलींडरही मोफत मिळणार आहेत. आधी कुटुंबातील दोन लोकांना योजना लागू होती. पण आम्हीच शिंदे साहेबांना म्हणालो असे नका करु, एका घरात दोन सूना आणि सासू आहेत. भांडण लागतील,’ असे ते भाषणात म्हणाले.
खोतकरांचा सल्ला
‘आम्ही त्यांना मिळालो घरात जितके जण आहेत त्यांना योजना लागू करा. आता महिलांनी थोडी चालाखी करावी. सासा-सुनांनी कागदोपत्री वेगवेगळे राहावे. जेणेकरून तुम्हाला गॅस सिलेंडर वाढवून मिळतील,’ असा अजब गजब सल्ला खोतकर यांनी उपस्थित महिलांना दिला आहे.
लाडकी बहीण योजना काय आहे?
अर्थसंकल्पात महिलांसाठी काही योजनांची घोषणा करण्यात आली आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ अंतर्गत 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. लाभार्थी महिलांना दरवर्षी सुमारे 46 हजार कोटी रुपये सरकार देणार आहे. घरगुती गॅस सिलींडरची घोषणा करण्यात आली आहे.
वर्षाला तीन सिलींडर
लाभार्थी महिलांना तीन घरगुती गॅस सिलींडर मोफत दिले जाणार आहेत. 56 लाख 16 हजार महिलांसाठी वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याबाबतच्या योजनेची घोषणा केली आहे. बीपीएल रेशनकार्ड अर्थात पिवळं आणि केशरी रेशनकार्ड असणाऱ्या महिलांना वर्षाला 3 सिलींडरचे पैसे थेट खात्यात मिळणार आहेत. या माध्यमातून राज्यातील तब्बल 56 लाख 16 हजार महिलांना याचा थेट फायदा होणार आहे.