विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. वरोरा विधानसभेमध्ये मात्र अत्यंत चुरशीच्या अशा लढती होतील असे चित्र आहे. अशात वरोरा विधानसभेतून उमेदवारी मिळावी, यासाठी मिनल आत्राम यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिले आहे.
वरोरा विधानसभेतील उमेदवारीवरून सध्या धानोरकरांच्या कुटुंबीयांमध्येच सुंदोपसुंदी सुरू आहे. भासरा, भाऊ की निष्ठावंत कार्यकर्ता ? अशा धर्म संकटात खासदार प्रतिभा धानोरकर सापडल्या आहेत. काँग्रेसमध्ये या विधानसभेतून लढण्याकरिता इच्छुकांची संख्या मोठी आहे. तर तर भाजपमध्येही इच्छुकांची संख्या कमी नाही. त्यात आता शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांची संख्याही आता वाढायला लागली आहे. भद्रावती नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष मीनल आत्राम यांनीही आता या स्पर्धेत उडी घेतली आहे.
मीनल आत्राम भद्रावतीच्या नगराध्यक्ष होत्या. तीन वेळा नगरसेवकपदाचा त्यांचा कार्यकाळ होता. त्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख आहेत. ‘गेल्या तीस वर्षापासून मी पक्षाशी एकनिष्ठ आहे. या विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कार्य केले आहे. एक कट्टर शिवसैनिक म्हणून मी सातत्याने हिंदुत्ववादी विचारांचा पुरस्कार केलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमेदवारी देताना माझ्या नावाचा विचार करतील,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
मीनल आत्राम यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पत्र लिहिले आहे. पत्राद्वारे त्यांनी वरोरा विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे. या विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून नितीन मत्ते यांच्याकडे पाहिलं जातं. परंतु आता मीनल आत्राम यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून उमेदवारीची मागणी केल्यामुळे इच्छुकांच्या संख्येत भर पडली आहे.
Legislative Council : चंद्रकांत रघुवंशींना पुन्हा व्हायचेय आमदार!
भद्रावतीच्या विकासात योगदान
शिवसेना पक्ष बांधणीत मीनल आत्राम यांनी महिलांचे मोठे संघटन उभे केले आहे. भद्रावती नगर परिषदेच्या विकासामध्ये सुद्धा त्यांचे योगदान आहे. या पार्श्वभूमीवर एक महिला उमेदवार म्हणून त्यांच्या नावाचा विचार मुख्यमंत्री करतील का? अशी चर्चा आता वरोरा विधानसभा क्षेत्रात सुरू झाली आहे .
आदिवासी समाजाचाही पाठिंबा
या मतदारसंघांमध्ये आदिवासी समाजही मोठ्या प्रमाणात आहे. मी आदिवासी समाजाची विदर्भ अध्यक्ष सुद्धा आहे. त्यामुळे आदिवासी समाज सुद्धा माझ्या पाठीशी उभा राहील. त्यासोबतच ओबीसी व इतर समाजही मला मदत करेल, असा विश्वास त्यांनी पत्रातून व्यक्त केला आहे.