Nagpur : नागपूरकरांच्या ध्यानीमनी नसलेली मेट्रो आज शहराच्या मध्यवर्ती भागातून धावत आहे. 2014 मध्ये नितीन गडकरी केंद्रात मंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर दोघांनीही मेट्रोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. बघता बघता पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आणि मेट्रो धावू लागली. दरम्यानच्या काळात मेट्रोच्या विस्ताराच्या संदर्भात घोषणा करण्यात आल्या. दुसऱ्या टप्प्यात हे काम होईल असे सांगण्यात आले. मात्र, देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी येताच दुसऱ्या टप्प्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता कन्हानपर्यंत मेट्रो धावणार आहे.
नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला चालना मिळाल्यामुळे नागपूर शहरासह नजीकच्या परिसराचा अधिक गतीने विकास होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. दुसऱ्या टप्प्यात विविध मार्गांचा विस्तार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी कामठी आणि कन्हानपर्यंत मेट्रो धावणार असल्याची घोषणा केली होती. आता राज्य सरकारने सामंजस्य कराराच्या माध्यमातून यादिशेने पाऊल टाकले आहे.
अर्थसहाय्य
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून 1527 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात यासंदर्भात मंगळवारी सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पामुळे नागपूर शहरासह परिसराच्या विकासाला आणखी गती मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आणि आशियाई विकास बँकेच्या संचालक मिओ ओका यांनी अर्थसहाय्याच्या करारावर स्वाक्षरी केली. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आशियाई विकास बँक (ADB) आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक (EIB) यांच्याकडून एकूण 3586 कोटी रुपयांचा वित्तपुरवठा करण्यात येणार आहे. त्यापैकी 1527 कोटी रुपये आशियाई विकास बँकेकडून मिळणार आहेत. त्यासंदर्भातील करार मंगळवारी करण्यात आला. महामेट्रोला हा वित्तपुरवठा जपानी येन या चलनामध्ये मिळणार आहे. त्यामुळे कर्जावर तुलनेने कमी व्याज द्यावे लागणार आहे. महामेट्रोला या कर्जाची रक्कम केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (MoHUA) माध्यमातून उपलब्ध करून दिली जाईल.
10 लाख नागरिकांची सोय
नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात खापरी ते एमआयडीसी इएसआर दरम्यान 18.5 किलोमीटर, ऑटोमोटिव्ह स्क्वेअर ते कन्हान नदी दरम्यान 13 किलोमीटर, प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्टनगर दरम्यान 5.6 किलोमीटर आणि लोकमान्यनगर ते हिंगणा दरम्यान 6.7 किलोमीटर असा एकूण 43.8 किलोमीटरचा असणार आहे. या मेट्रो प्रकल्पाचा लाभ नागपूर परिसरातील 10 लाख रहिवाशांना होणार आहे.