Municipal Corporation Election : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आटोपल्यामुळे आता महापालिका निवडणुकांकडे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच महापालिका निवडणुकीच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु, यंदाच्या निवडणुका पूर्णपणे वेगळ्या असणार आहेत. कारण विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या बहुमताचे परिणाम मनपा निवडणुकांवर बघायला मिळणार आहेत. त्यादृष्टीने महायुतीमधील मित्र पक्षांनी तयारी सुरू केली आहे. नागपुरात राष्ट्रवादीने (अजित पवार गट) बैठक घेतली आणि भाजपकडे जागांसाठी आग्रह करण्याचा निर्णय घेतला.
ओबीसी आरक्षण आणि प्रभागरचनेचा विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे निवडणुका लंबणीवर पडल्या आहेत. नागपूर, अमरावती, पुणे, मुंबईसह राज्यातील 27 महानगरपालिकांमध्ये सध्या प्रशासनाच्या हाती कारभार आहे. नागपूर महानगरपालिकेत फेब्रुवारी-मार्च 2022 मध्ये निवडणूक अपेक्षित होती. पण विषय न्यायप्रविष्ठ असल्यामुळे ही निवडणूक होऊ शकली नाही. 2017च्या निवडणुकीत नागपूर महानगरपालिकेत 38 प्रभाग होते. विजयी झालेले 152 नगरसेवक आणि 5 नामनिर्देशित सदस्य अशी एकूण 157 नगरसेवकांची महानगरपालिका अस्तित्वात होती. आता प्रभाग रचनेच्या संदर्भातील प्रकरणही न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे निर्णय काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, नागपूर महानगरपालिकेत आतापर्यंत भाजप-शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढत आले. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीतही युती आणि आघाडीच होती. यात भाजपने 108 जागा जिंकून सत्ता स्थापन केली होती. शिवसेना सोबत असल्यामुळे औपचारिकता म्हणून काहीवेळा शिवसेनेकडे उपमहापौरपदही देण्यात आले आहे. किशोर कुमेरिया, शेखर सावरबांधे यासारख्या नेत्यांनी हे पद भूषविले आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेसाठी मोजून 10 किंवा 12 जागा सोडल्या होत्या. यंदा शिवसेनेच्या (शिंदे गट) वाट्याला किती जागा येतील, याची उत्सुकता लागलेली आहे.
विशेष म्हणजे प्रत्येक निवडणुकीत भाजप-शिवसेना यांच्यात जागावाटपावरूनच जोरदार रस्सीखेच होत असते. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) भर पडली आहे. राज्यात महायुती आहे आणि यात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी असे तीन पक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नगरसेवक नागपुरात होता, पण तोही शरद पवारांच्या गटात आहे. अशात राष्ट्रवादीला जागा मिळाल्या नाहीत तर आपले अस्तित्व नागपुरात उरणारच नाही, अशी भीती अजित पवार गटाच्या नेत्यांना आहे. त्यादृष्टीने नागपुरात किमान 50 जागांवर लढण्याची आपण तयारी करायची. एवढ्या जागा भाजपने राष्ट्रवादीसाठी सोडाव्या, असा ठराव बैठकीत करण्यात आला.
Assembly Election : राज्यातील 23 उमेदवारांचे मतमोजणीवर आक्षेप
निवडून येणारे उमेदवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी आपल्याकडे निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादीचा शहरात उत्तम जनसंपर्क आहे. आमच्याकडे किमान शंभर उमेदवार असे आहेत ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे, असेही प्रशांत पवार यांनी म्हटले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रशांत पवार यांनी भाजप उमेदवारांच्या बहुतांश सभांमध्ये हजेरी लावली होती, हे विशेष.