Aashish Jayswal : शिंदे गटाचे आशीष जयस्वाल यांच्या उमेदवारीला जाहीर विरोध केल्यानंतर माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांना दणका दिला. भाजपने त्यांना सहा वर्षांसाठी बाहेरचा रस्ता दाखविला. त्यानंतर रामटेकमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले. रेड्डी यांच्या समर्थनार्थ रामटेकमधील पाचशेहून अधिक पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला. याचा महायुतीला फटका पडू शकतो याची फडणवीस आणि बावनकुळेंना चांगलीच जाण आहे. त्यामुळे फडणविसांनी शनिवारी नाराजवीरांची भेट घेत त्यांची समजूत काढली.
नाराज पदाधिकाऱ्यांशी भेट
नागपुरातील शासकीय निवासस्थानी पोहोचल्यावर शनिवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नाराज पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांना पक्षासोबतच राहण्याची सूचना केली. याचा परिणाम प्रत्यक्ष निवडणुकीत किती होतो, हे वेळच सांगणार आहे. पण या सर्व नाराज पदाधिकाऱ्यांची रेड्डी यांच्याबद्दल काय भूमिका आहे, हे अद्याप कळू शकले नाही. फडणविसांनी या पदाधिकाऱ्यांची समजूत काढल्यानंतर रेड्डी एकटे पडणार का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
रेड्डी यांनी निलंबनाविरोधात राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनादेखील पत्र लिहीले आहे. मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे माझ्यावर कारवाई झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समर्थकांविरोधात कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप लावला. त्यामुळे भाजपमध्ये विविध चर्चांना पेव फुटले आहे. या प्रकरणात लवकरात लवकर ‘डॅमेज कंट्रोल’ आवश्यक होते. त्यामुळेच उपमुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला.
सर्व नाराज पदाधिकाऱ्यांना शनिवारी रात्री देवगिरीवर बोलावण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची समजूत काढली. ही निवडणूक भाजपसाठी किती महत्त्वाची आहे, हे पटवून दिले. निवडणूकीत महायुतीला साथ देत जो उमेदवार घोषित होईल, त्याचा प्रामाणिक प्रचार करण्याचे आवाहन दोन्ही नेत्यांनी केले आहे. आता या दोघांच्याही आवाहनाला हे पदाधिकारी प्रतिसाद देतात की रेड्डी यांची साथ देत जयस्वाल यांच्याविरोधात प्रचार करतात. यावर रामटेकमधील अनेक राजकीय गणिते अवलंबून आहेत.
तरीही जयस्वाल यांना धाकधूक
मल्लिकार्जून रेड्डी निवडणुकीच्या रिंगणात उतरले तरीही आणि बाहेर राहिले तरीही जयस्वाल यांच्यावरील संकट कायम आहे. कारण मल्लिकार्जून रेड्डी आणि प्रहारचे रमेश कारामोरे हे जयस्वाल यांचीच मते आपल्याकडे वळवणार आहेत. अशात काँग्रेसच्या उमेदवाराचाही फायदा होऊ शकतो. त्यामुळे जयस्वाल यांची धाकधूक अखेरपर्यंत कायम राहील, असे दिसत आहे.