NCP Meeting : राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा दारूण पराभव झाला. पराभवाचा दणका बसल्यानंतर महायुतीतील सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांनी उमेदवारांची चाचपणी, बैठका आणि मेळावे घेत आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक 2 जुलै रोजी मुंबईत पार पडली.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष किती जागा लढविणार, यावरून दावे – प्रतिदावे सुरु आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे काही नेते जागा वाटपाबाबत विविध वक्तव्य करत आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पक्ष 80 जागा लढवणार असा दावा छगन भुजबळ यांनी केला होता.
अजित पवार गटांकडून निर्णय
देवगिरी बंगला अजित पवार यांचे शासकीय निवासस्थान असून, या बंगल्यामध्ये राष्ट्रवादीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणूक महायुती सोबतच लढवणार असा स्पष्टपणे निर्णय घेण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीचे लवकरच जागावाटप होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) विधानसभा निवडणूक 85 जागांवर लढविणार, असा दावा अजित पवार यांच्याकडून करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकीत अजित पवार यांनी थेट निवडणुकीच्या तयारीला लागा, मित्र पक्षांसोबत वादग्रस्त विधान टाळा, असे सर्व आमदार आणि पक्षाचे प्रवक्ते यांना खडकावून सांगितले आहे.
Maratha Reservation : मराठा संघटना आक्रमक; जरांगेंना झेड ‘प्लस सिक्युरिटी’ द्यावी..
शासनाची विकास कामे आणि योजना राज्यातील संपूर्ण जनतेपर्यंत पोहोचवा. महिलांकरीता एसटी बसमध्ये अर्ध्या दारात तिकीट, लाडकी बहीण तसेच इतर लोक कल्याणकारी योजना जनतेसाठी महायुतीच्या सरकारने सुरु केल्या आहे. त्या योजनांचा प्रचार स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जनतेमध्ये करावा.
देवगिरी बंगल्यावर झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह इतर नेते हजर होते.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या 2 जुलै रोजी झालेल्या बैठकीत विधानसभेच्या 85 जागा लढवण्याचा ठराव झाला आहे. आता महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) याबाबत काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.