Manpower Recruitment : महाराष्ट्रातील शासकीय वैद्याकीय महाविद्यालयांमधील पदभरती लवकरच होणार आहे. अतांत्रिक, तांत्रिक व परिचर्या या वर्गातील पदांची भरती करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण आयुक्तांनी मनुष्यबळाची स्थिती मागविली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना इच्छित ठिकाणी बदली हवी असते. राज्यात नऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नव्याने सुरू होत आहे. त्यामुळे त्या त्या जिल्ह्यात बदली हवी असलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने नियुक्ती देण्यात येणार आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागातील वर्ग तीनच्या बदलीचे आदेश लवकरच निघणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात हिंगोली, पालघर, जालना, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम, भंडारा, गडचिरोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहेत. सरकारने याची घोषणा केली होती. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने त्यात काही त्रुटी काढली होती. आता ही त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. त्यानंतर नऊ वैद्यकीय महाविद्यालयांनी पुन्हा आयोगाकडे अपील दाखल केले. अपिलात मनुष्यबळाची भरती करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे.
एक महिन्यात भरती
नऊ महाविद्यालयांमध्ये एक महिन्यात मनुष्यबळ भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. काही पदांवरील भरतीच्या बाबतीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (MPSC) पाठपुरावा करण्यात आला आहे. लोकसेवा आयोगाच्या शिफारशीनंतर प्राध्यापकांसह इतर सहप्राध्यापकांची भरती केली जाणार आहेत. एक महिन्याच्या कालावधीमध्ये उमेदवारांची शिफारस करण्याबाबतची विनंती लोकसेवा आयोगाला करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने यासंदर्भात पाठपुरावा सुरू केला आहे. त्यानुसार आता नऊ शासकीय महाविद्यालयात अतांत्रिक, तांत्रिक व परिचर्या या वर्गातील पदांची भरती करण्यात येणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग तीनच्या पदांची भरती बदलीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तूर्तास इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग तीन संवर्गातील कर्मचाऱ्यांची विनंती अर्ज घेतली जात आहेत. वैद्यकीय शिक्षण आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत. अर्ज आल्यानंतर आयुक्तांकडून बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे. आयुक्त कार्यालयाने या सर्व नऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना पत्र पाठवले आहे. त्यांना आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाची मागणी नोंदविण्याच्या सूचना दिल्या आहेत. बदलीसाठी विनंती करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंधित जिल्ह्यातही पाठविण्यात येणार आहे.