महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : निवडणुकीपूर्वीची जरांगे पाटलांची बैठक महत्वाची

Maratha Reservation : अकोल्यातील मराठा समाजही सहभागी होणार!

Akola : राज्यासह देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सर्व पक्षांकडून जोरदार तयारीही सुरु आहे. अनेक पक्षांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून पक्षाने प्रचाराचा नारळही फोडला आहे. अशातच मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीपूर्वी समाजाच्या बैठकीचं आयोजन केले आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान या बैठकीकरिता अकोला जिल्ह्यातील सकल मराठा समाज सहभागी होणार आहे. यासाठी आवाहनदेखील करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाकडून निवडणूकीपूर्वी बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. 24 तारखेची अंतिम बैठक आणि ठोस बैठक असेल. सरकारला पश्चातापाची वेळ आणली नाही तर नाव बदलून ठेवीन, असा इशारा जरांगे पाटलांनी यापूर्वीच सरकारला दिला आहे. बैठकीनंतर सरकार विचार करेल की, अंमलबजावणी करणं परवडलं असतं, असंही त्यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की, 24 तारखेला आम्ही राज्यातील मराठा समाजाची बैठक लावली.

बैठकीत आम्ही आमची पुढची दिशा ठरवणार आहे. या बैठकीला सर्व तज्ज्ञ हजर राहणार आहेत. समाजाकडून दोन दिवस तिथे जेवणाचीसुद्धा व्यवस्था केली आहे, अशी माहिती जरांगेंनी दिली आहे. ही प्रचंड मोठी बैठक आणि निर्णायक बैठक असणार आहे. आचारसंहिता लागण्याच्या अगोदर निर्णय घेणार होते. मात्र घेतला नाही. 24 तारखेला अंतिम बैठक आणि अंतिम निर्णय मराठा समाजाचा असणार आहे. एकमताने ठोस निर्णय घ्यायचा आहे. सरकार कायद्याने खेटत असेल तर, आम्हीदेखील आता सरकारला कायद्याने खेटणार आहोत आणि यावर 24 तारखेला निर्णय होईल.

अकोल्यातील मराठा जाणार!

24 मार्चची आयोजित करण्यात आलेली बैठक महत्वाची मानली जात आहे. या बैठकीला मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे राज्यभरातून सकल मराठा समाज या बैठकीला जाणार आहे. यासाठी तसं नियोजनदेखील करण्यात आलं आहे. तर अकोला जिल्ह्यातील मराठा बांधवदेखील या बैठकीत सहभागी होतील. अकोला जिल्ह्यातील मराठा समाजाला बैठकीला उपस्थित राहण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!