(या मजकुरातील आक्षेपार्ह वाटणारे शब्द ‘द लोकहित’ने काढून टाकले आहेत, याची कृपया नोंद घ्यावी)
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यांवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना जरांगेंची जीभ पुन्हा घसरली आहे. ‘माझ्या नादी लागू नका, तू किती पैसेवाला आणि करप्ट आहेस हे सांगायला लावू नकोस. तू जात विकली आहेस. एवढं प्रेम उतू जात असेल तर फडणवीसांसोबत लग्न कर’, असे जरांगे म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेत. आता मराठे आमदार आणि मंत्री मराठ्यांच्याच अंगावर घालत मजा पाहत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला. मराठा आरक्षणावरून भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली होती. त्यावर गुरुवारी प्रत्युत्तर देताना जरांगे संतापले. ते म्हणाले की, ‘हा कोण आता? माझ्या नादाला लागू नको, तू किती पैसेवाला आणि किती करप्ट आहेस मला माहिती आहे. मी तुला काय म्हटलंय का? आमच्या नादी लागू नकोस,’ अश्या जहरी शब्दात टीका करताना मनोज जरांगे पाटील यांची जीभ घसरली.
जरांगेंना डीडी म्हणजे देवेंद्र द्वेषाचा रोग
मनोज जरांगे पाटील यांना डीडी म्हणजे देवेंद्र द्वेषाचा रोग झाल्याची टीका भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली होती. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. यातच आता मनोज जरांगे यांच्या टिकेला भाजप नेते प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
हा तर संशोधनाचा विषय
भाजप नेते प्रसाद लाड यांनी व्हिडिओ शेअर करत मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. प्रसाद लाड म्हणाले, ‘मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन द्वेष करत आहेत. जरांगे पाटील यांना डीडी नावाचा रोग झाला आहे. त्यांना देवेंद्र द्वेष झालाय. 60 वर्षांत जे होऊ शकलं नाही ते देवेंद्रजींनी केलं. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले, जरांगे पाटील कोणाच्या छत्रछायेखालून हा द्वेष करीत आहेत हा संशोधनाचा विषय आहे.’ अशी टीका त्यांनी केली होती.