Maratha Reservation : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील सरपंचांच्या निवासस्थानी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा मुक्काम आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील आकाशात ड्रोन फिरताना दिसून आले आहे. 1 जुलैसोमवारी मध्यरात्री एक ड्रोन मनोज जरांगे मुक्कामी असलेल्या घराभोवती घिरट्या घालत होता. मनोज जरांगे पाटील यांनी स्वत: गच्चीवर जाऊन हा ड्रोन पाहिला.
आता मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी मराठा संघटनेकडून करण्यात येत आहे. त्यासाठी मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.
अंतरवाली सराटी या गावावर ड्रोनने टेहळणी होत असल्याचे वृत्त आले आहे. त्यानंतर मराठा समाजात आणि राज्यातील राजकारणातून मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी मराठा संघटनेकडून करण्यात आली. त्यासाठी मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या जिजाऊ चौकात मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनात अनेक पदाधिकारी सहभागी झाले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.
अंतरवालीच्या गावकऱ्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली असली तरी मराठा आंदोलक हे काहीसे धास्तावले आहेत. त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी पांडुरंग तारख यांनी जरांगे यांना सरकारने झेड प्लस सिक्युरिटी प्रदान करावी, अशी मागणी केली आहे.
यासाठी पांडुरंग तारख हे 3 जुलै रोजी जालन्यातील जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता सरकार मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा देणार का, हे पाहावे लागेल.
शंभुराज देसाई काय म्हणाले ?
राज्याचे गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या घराबाहेर फिरणाऱ्या ड्रोनबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले. या संदर्भात चौकशी करुन सविस्तर अहवाल दिला जाईल. जरांगे पाटील यांना याआधी हत्यारी संरक्षण दिले आहे. पोलिस अधिकाऱ्यांसबोत बोलून अधिक संरक्षण देण्याची गरज असल्यास ते दिले जाईल, असे आश्वासन शंभुराज देसाई यांनी सभागृहात दिले.