Assembly Election : महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सध्या एकाही उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण वाद नसलेल्या जागांवरील उमेदवारांची यादी आता तयार झाली आहे. लवकरच ही यादी जाहीर होईल, असे संकेत महायुतीकडून देण्यात आले आहेत. भाजपच्या यादीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (19 ऑक्टोबर) नागपुरात माहिती दिली. अशात यवतमाळ जिल्ह्यातील एक विद्यमान, दोन माजी मंत्र्यांचं आणि एका आमदाराचं काय करायचं याबाबतचा निर्णय झाला आहे. महायुतीमधील एका नेत्यांनं याबाबत बोलताना ‘द लोकहित’ला ही माहिती दिली.
सद्य:स्थितीत यवतमाळमध्ये एक विद्यमान व दोन माजी मंत्र्यांचं काय होणार, यावर चर्चा सुरू आहे. विद्यमान मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या काळात गंभीर आरोप झाला होता. त्यामुळे त्यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर राठोड हे परिवारासह उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले. परंतु ठाकरे यांनी ‘मातोश्री’ची माया राठोड यांच्यावर दाखविली नाही. राठोड यांना दादही दिली नाही. त्यामुळे राठोड चांगलेच दुखावले. अनेक दिवस मंत्रिपदाविना राहिलेल्या राठोड यांनी संधी मिळताच ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ केला.
फुटीचा फायदा
महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकण्यासाठी फडणवीस यांनी देवेंद्रास्त्राचा प्रहार केला. एकनाथ शिंदे भाजपच्या गळाला लागले. ठाकरे, पवार, पटोले यांना कानोकान खबरही होऊ न देता शिंदे अनेक आमदारांसह गायब झालेत. महाविकास आघाडी सरकारच्या खुर्चीचे पाय मोडले. उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. महायुतीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर संजय राठोड यांचं दमदार ‘कमबॅक’ झालं. राठोड यांना मृद व जलसंधारण मंत्रिपद मिळालं. तब्बल दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची लॉटरीही त्यांना लागली. आता त्यांचं काय करायचं याचा निर्णय शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
असाच निर्णय मदन येरावार आणि डॉ. अशोक उईके यांच्याबाबतही झाला आहे. येरावार आणि उईके हे दोघेही यापूर्वी मंत्री होते. त्यापैकी उईके यांच्याकडे राळेगावात पक्षसंघटन नसल्याची टीका विरोधक करतात. पकड नसल्यानं ते विजयी होतील काय, याबाबत अनेकांच्या मनात साशंकता आहे. मदन येरावारही मध्यंतरीच्या काळात अडचणीत सापडले होते. बनावट कागदपत्र तयार करुन भूखंड बळकावल्याप्रकरणी मदन येरावार यांच्यासह 17 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यवतमाळ येथील प्रथम श्रेणी न्यायालयाच्या आदेशावरून 2019 मध्ये ही कारवाई झाली होती. त्यावेळी ते मंत्री होते. आयुषी किरण देशमुख यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदही घेतली होती. आता त्यांचंही काय करायचं याचा फैसला करण्यात आला आहे.
नाईकांबाबतही फिक्स
एक विद्यमान आणि दोन माजी मंत्र्यांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार इंद्रनिल नाईक यांच्या बाबतही दादांनी काय करायचं ते ठरवलं आहे. नाईक हे पुसदचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी महायुतीच्या मकरसंक्रांती मेळाव्यात माजी खासदार भावना गवळी यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. बंजारा समाजाला प्रतिनिधित्व देण्याची थेट मागणी नाईक यांनी केली होती.
Ralegaon Constituency : पुरके मास्तरांचं नाव पुन्हा यादीसाठी तयार
अशात आता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं या सर्व नेत्यांबद्दलचा ‘निर्धार पक्का’ केला आहे. संजय राठोड यांना दारव्हा-दिग्रस, इंद्रनिल नाईक यांना पुसद, अशोक उईके यांना राळेगाव आणि मदन येरावार यांना त्यांच्याच मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी मिळणार आहे. लवकरच या नावांची घोषणा होणार आहे. घोषणा झाली नसली तरी या सर्व नेत्यांना आता ‘कन्फर्मेशन’ देण्यात आलं आहे. त्यामुळं त्यांनी दणक्यात प्रचार सुरू केला आहे.