Pray For Power : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. अशात उमेदवारी मिळविण्यापासून तर निवडणूक जिंकण्यापर्यंतची कसरत नेत्यांना करावी लागणार आहे. अशात प्रसंगी सव्यापसव्य मार्गांचा वापर करण्याची तयारीही नेत्यांनी ठेवली आहे. यंदाची निवडणूक वाटते तितकी सोपी नाही. त्यामुळं अनेक नेत्यांनी विजयासाठी देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत. अशात अनेक नेते आता महाराज, गुरू आणि देवांनाही शरण गेले आहेत.
सावनेरच्या राजकारणात प्रचंड वजन असलेले एका नेत्याच्या घरी देवीचं अनुष्ठान केलं जातं. कोणतंही संकट आलं तरी या नेत्याचं कुटुंब देवीला शरण जातं. आतापर्यंत नवचंडी, शतचंडी अशा सात्विक पुजनातून या नेत्यानं देवीचा आशीर्वाद घेतला आहे. कुलदेवीच्या कृपेमुळेच आजही या नेत्याचं राजकीय वजन अबाधित असल्याचं सांगण्यात येतं. नागपूर शहरातील एक विद्यमान आमदार बागेश्वर धाम बाबांचे मोठे भक्त झाले आहेत. बागेश्वर धामचे आचार्य धीरेंद्र शास्त्री यांच्यासमोर ते नतमस्तक होतात.
विजयासाठी प्रार्थना
चंद्रपूर जिल्ह्यातील एक माजी खासदार बगलामुखी देवीला मानतात. प्रत्येक निवडणुकीपूर्वी ते न चुकता मध्य प्रदेशातील दतिया येथे देवी बगलामुखीच्या दर्शनाला जायचे. असं सांगण्यात येतं की शत्रुंना पराभूत करण्यासाठी देवी बगलामुखीची उपासना केली जाते. नागपुरातील काही पंडितांनी या नेत्याकडे काही वर्षांपूर्वी बगलामुखीचं हवन केलं होते. आता त्यांच्या कुटुंबीयांनी या हवनाची परंपरा सुरू ठेवलेली नाही. पण आतापर्यंत मिळालेलं यश हे देवाचीच कृपा असल्याचं त्यांचे परिवारातील लोक सांगतात.
धार्मिक अनुष्ठानांसोबत अनेक नेत्यांनी निवडणूक येताच वेगवेगळ्या ज्योतिष्यांकडेही धाव घेतली आहे. संबंधित ज्योतिष्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार अनेक नेत्यांच्या हातांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रत्नही दिसतील. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा कोणत्याही पक्षातील नेते यात मागे नाहीत. फरक तो एवढाच आहे की, काहींनी बोटांमध्ये रत्न धारण केले आहेत, तर काहींनी आपण हे काही मानत नाही हे दाखवून देण्यासाठी गळ्यात रत्न किंवा रुद्राक्ष धारण केले आहेत.
महाराजांचे प्रस्थ
ज्योतिष्यांप्रमाणे विदर्भातील नेत्यांमध्ये गुरू आणि महाराजांचंही मोठं प्रस्थ आहे. इंदौरचे दत्त उपासक गुरू नाना महाराज तऱ्हाणेकर यांचे शिष्य अरविंद आगाशे काका हे पूर्वी खामगावात असायचे. खामगात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत नेते त्यांच्या दर्शनासाठी जायचे. आगाशे काका यांचं निधन झाल्यानंतर नेते आता खामगावातील त्यांच्या समाधी मंदिरात दर्शनासाठी जातात. आगाशे काका हे दत्तमार्गी असले तरी श्रीकृष्णाने परमभक्त होते, हे फारच कमी लोकांना ठाऊक आहे.
बुलढाणा जिल्ह्यात घाटाखालील असलेल्या मलकापूर तालुक्यात माकोडीचे बाबा हे देखील प्रसिद्ध आहेत. संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय नेते त्यांच्या दर्शनासाठी हमखास जातात. श्रीहरी महाराज हे त्यांचं नाव. प्रल्हाद महाराज रामदासी यांचे ते शिष्य. बाबांनी ज्याच्या डोक्यावर फेटा बांधला त्याचं भाग्य उजळलं असं मानलं जातं. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील एकही असा नेता नसावा जो मलकापूरजवळ असलेल्या माकोडी येथे गेला नसावा.
बंजाऱ्यांची काशी
वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्याला लागून असलेले पोहरादेवी ही बंजारा समाजाची काशी. या दोन्ही जिल्ह्यातील सर्वच नेते पोहरादेवी येथे हमखास जातात. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे येऊन गेले. महायुती सरकारनेही पोहरादेवीच्या महाराजांना विधान परिषदेवर राज्यपालनामित आमदार केले आहे. यामागे श्रद्धा आणि सामाजिक राजकारण दोन्हीही कारणीभूत आहे. अमरावती जिल्ह्याचा विचार केल्यास काँग्रेसचे अनेक नेते गुरूकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भक्त आहेत. यातील काही नेते नियमितपणे गुरूगिता आणि हरीपाठ म्हणतात.
ज्योतिष्यशास्त्रात असं म्हटलं जातं की राजकारणात करीअर घडविण्यासाठी सूर्याची स्थिती अत्यंत चांगली असणं गरजेचं आहे. पण सूर्य हा अहंकार निर्माण करणारा ग्रह असल्याचं ज्योतिष्यात लिहिलं आहे. सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे. इतर ग्रह आणि संपूर्ण सृष्टी त्याच्यापासून ऊर्जा आणि प्रकाश घेते. अगदी चंद्र देखील सूर्याचीच किरणे परावर्तित करतो. त्यामुळे राजकारणी लोकांमध्ये अहंकार आणि मीपणा असतो असं बोललं जातं. पण कितीही अहंकार असला तरी प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या शक्तीपुढं नतमस्तक होतोच, असंच यावरून म्हणावं लागेल.