Congress On AAP : अलीकडेच अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आता दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांनी सूत्र स्वीकारली आहेत. पण त्यानंतर पक्षामध्ये ऊर्जा निर्माण होण्याऐवजी उलटाच परिणाम झाला आहे. आतिशी मुख्यमंत्री झाल्यानंतर दिल्लीत आम आदमी पार्टीला (आप) मोठा झटका बसला आहे. ‘आप’चे अनेक नेते काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.
काँग्रेसमध्ये प्रवेश
रविवारी (ता.29) काँग्रेसच्या दिल्ली युनिटचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टी (आप)चे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी आपच्या नेत्यांचे स्वागत केले. देवेंद्र यादव म्हणाले, ‘राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. याला भाजप आणि आप दोन्ही सरकारं तितकीच जबाबदार आहेत. काँग्रेस सत्तेत असताना कायदा आणि सुव्यवस्था प्रभावीपणे नियंत्रणात होती. लोकांना 24 तास पाणीपुरवठा होता. पाणी साचू नये म्हणून प्रत्येक पावसाळ्यापूर्वी नाल्या व गटारं स्वच्छ केली जायची. काँग्रेस सरकारने लोकांना अखंडित वीज पुरवठा आणि दिल्लीत देशातील सर्वात स्वस्त दरात वीज उपलब्ध होईल याचीही खात्री केली होती.’
केजरीवाल यांच्यावर टीका
कथित मद्य धोरण घोटाळ्यात सर्वोच्च न्यायालयातून केजरीवाल यांना जामीन मिळाला. 15 सप्टेंबरला केजरीवाल आम आदमी पार्टीच्या मुख्यालयात पोहोचले होते. त्यानंतर केजरीवाल यांनी दोन दिवसांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. जोपर्यंत जनता माझ्या प्रामाणिकपणावर शिक्कामोर्तब करत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही, असे ते म्हणाले होते. मी प्रत्येक घरा-घरात जाईन आणि जनतेचा निर्णय येईपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही. असे ते म्हणाले होते. यावर यादव म्हणाले की, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल आपल्या सरकारच्या मंत्र्यांसह सर्वांमध्ये दोष शोधण्यात व्यस्त होते. तुरुंगात असतानाच त्यांनी मुख्यमंत्रीपद का सोडले नाही. आप मुळे दिल्लीत पाणीटंचाई निर्माण झाली. यावर आतिशी यांनी उपायोजना का केली नाही असेही ते म्हणाले.
तरुण मुख्यमंत्री
आतिशी मार्लेना या भारतातील सध्याच्या सर्वांत तरुण मुख्यमंत्री ठरल्या आहेत. वयाच्या 43 व्या वर्षी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. त्या आम आदमी पार्टीच्या आघाडीच्या नेत्या आहेत. दिल्ली सरकारमधील बहुतांश विभागांची जबाबदारी सांभाळून त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. आमदार गोपाल राय, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज, इम्रान हुसेन आणि मुकेश अहलावत यांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते शपथविधीवेळी उपस्थित होते. आतिशी मार्लेना यांनी पदभार सांभाळल्यानंतर आप पक्षातील नेते काँग्रेसमध्ये दाखल झाले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आला आहे.