Assembly Election : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत. कुणबी प्रमाणपत्र, सगेसोयरेंची अंमलबजावणी आणि ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी आग्रही मागणी जरांगे पाटील यांची आहे. मनोज जरांगे यांचे सुरू असलेले उपोषण पुन्हा एकदा स्थगित झाले आहे. दरम्यान मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशात माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ मंत्री तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना थेट इशारा दिला आहे.
शहांचा समाचार घेतला
मराठा समाजाचे आंदोलन आमच्या पद्धतीने हाताळू, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते. या विधानाचा समाचार घेत मनोज जरांगे यांनी अमित शाह यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता अमित शाह यांच्यावर मनोज जरांगे यांनी निशाणा साधला आहे.
जरांगे म्हणाले, ‘पटेलांचा वापर करून तुम्ही कोणत्या बेटावर काय केले हे आम्हाला ठाऊक आहे. दमणमध्ये काय केले? अंदमानमध्ये काय केले? सिल्वासाच्या बेटावर काय केले? तुम्ही स्वत:च्याच लोकांना खड्ड्यात घातले. हे आम्हाला माहित आहे. माझ्या मराठा समाजाचे आंदोलन हाताळण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. आमच्या नादाला लागाल तर तुमचा राजकीय एन्काउंटर करू.’
स्वतःच्याच लोकांना मागे टाकले
मनोज जरांगे पुढे म्हणाले, ‘तुम्ही बरेच राजकीय एन्काउंटर घडवून आणले आहेत. अडवाणी कुठे कमी पडले? मुरली मनोहर जोशी कुठे कमी पडले? प्रमोद महाजनांनी काय कमी केले? अशोक सिंघल, प्रवीण तोगडिया यांच्याकडून काय कमी झाले? सुषमा स्वराज यांच्यासारख्या नेत्या कुठे कमी पडल्या? या सर्व लोकांना तूम्ही मागे पाडले. कर्नाटक, हरयाणा, गोवा आणि तामिळनाडूत तूम्ही तेच केले. वातावरण ढवळून काढण्याचे काम तुम्ही केले. अशोक सिंघल आणि तोगडिया यांनी तुमच्यासाठी काम केले. परंतु त्यांच्यावर पळून जाण्याची वेळ तुम्ही का आणली? त्यांना वाईट परिस्थितीत तुम्ही ढकलून दिले. स्वतःच्याच लोकांना मागे टाकून काम करण्याची तुमची पद्धत आहे. तुमची पक्ष आणि आंदोलने हाताळण्याची पद्धतही सर्वांना ठाऊक आहे. मोहन भागवत खंबीरपणे उभे आहेत म्हणून. नाहीतर तुम्ही कुणालाच सोडले नाही,’ अशी जहरी टीका मनोज जरांगे यांनी भाजप आणि अमित शाह यांच्यावर केली आहे.
जनता वठणीवर आणेल
तुम्ही चांगले काम करणाऱ्यांना संपविले. सत्ता हातात असली की काहीही करता येते. असे विचार जास्त काळ टिकत नाहीत. एक दिवस जनतेची खदखद बाहेर येते. तेव्हा लोक सत्तेच्याही विरोधात जातात. ज्या यंत्रणांचा वापर केला. त्याही बाजूला होतात. तुमचे रणगाडे आणि गोळ्या देखील संपतील. जनता तुम्हाला घरात घुसून वठणीवर आणेल. दादागिरी करून आंदोलन हाताळून तुम्हाला मस्ती आली आहे. त्याच पद्धतीने आमचे आंदोलन संपविणार असाल, तर जनता तुम्हाला वठणीवर आणेल. गुर्जर, पटेल यांचे आंदोलन हाताळून कोणता तीर मारला? असा प्रश्नही मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे.
जनता नाराज
देशातील व्यावसायिकही तुमच्यावर नाराजी व्यक्त करीत आहेत. खुद्द गुजरातमधील व्यापारीच देश सोडून परदेशात चालले आहेत. मराठ्यांचं आंदोलन हाताळणं एवढं सोपं नाही. अमित शाह शिर्डीला आले तेव्हा आरक्षणाबाबत बोललो होतो. नागपुरात असताना अमित शाह आरक्षण मुद्द्यावर काहीच बोलले नाहीत. मी तुम्हाला सरळ सांगतो. मराठा समाजाच्या नादाला लागू नका. मराठ्यांना आरक्षण द्या, तरच तुम्ही सत्तेत राहणार. अन्यथा तुमचे सत्तेत राहणे अतिशय अवघड आहे, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.