लाडकी बहीण योजना म्हणजे मतदान विकत घेण्याचा खेळ आहे. त्यानंतर ही योजना बंद पडणार आहे. योजना चांगली देखील असेल. पण आता तुमचेच लोक म्हणतात की मतदान नाही केलं तर योजना मागे घेऊ. याचाच अर्थ ही योजना म्हणजे सावकारी खेळ आहे” पण तुम्ही कितीही पैसे वाटप केलात तरी तुम्ही पडणारच आहात, असा जोरदार हल्लाबोल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते.
राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी दिवाळीनंतर राज्यातील महिलांना १५०० रूपयांच्या जागी ३ हजार रूपये देण्यात यावे, अशी मागणी करणार असल्याचे सांगितले. पण हे कधी शक्य आहे? जेव्हा तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्याल. ज्यांनी आशीर्वाद दिले नाही त्यांच्या खात्यातून १५०० रूपये काढून घेईल, असे वक्तव्य राणा यांनी केले होते. या वक्तव्यावर अनेक नेते संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनीही सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राणांसह शिंदे गटावर टीका
मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधतांना आमदार रवी राणा यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच शिंदे सरकारवरही टीका केली. मी त्या योजनेला नाव ठेवत नाही. ती योजना चांगली असेल. त्या योजनेचा लाभ नक्की घ्यावा. पण आता यावर शंका उपस्थित व्हायला लागली आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. आता समाज इतका भोळा राहिलेला नाही. पूर्वी समाज भोळा होता, अडाणी होता. सरकारने एखादी योजना दिली की त्याचा उदो उदो करायचे. मी त्या योजनेला नाव ठेवत नाही. ती योजना चांगली असेल. त्या योजनेचा लाभ नक्की घ्यावा.
पण आता यावर शंका उपस्थित व्हायला लागली आहे. काल तुमच्याच एका आमदाराने या योजनेबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. तुम्ही जर मतदान केलं नाही तर आम्ही पैसे परत घेऊ, असे ते म्हणाले. याचाच अर्थ तुम्ही जनतेसमोर उघडे पडले आहात. सरकारने ही योजना निवडणुकीत पैसे वाटपासाठीच सुरु केली आहे, हे यातूनच समोर येतंय. पोटातलं ओठावर येतंय, तसंच त्यांच्या तोंडातून हे वक्तव्य निघाले. त्यांना हे बोलायचे नव्हते”, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
या योजनेचा लाभ घ्यायचा की नाही, हे आता तुम्ही ठरवायचे आहे. तुम्ही कितीही पैसे वाटत फिरलात तरीही तुम्हाला आरक्षण हे द्यायलाच लागणार आहे. तुम्ही कितीही पैसे वाटप केलात तरी तुम्ही पडणारच आहात”, अशी टीकाही जरांगे पाटील यांनी केली.