Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुकीत उतरलो नाही. मात्र, आरक्षण मिळाले नाही तर पूर्ण ताकतीने संपूर्ण मराठा समाज विधानसभेच्या मैदानात उतरेल. आता नाव घेतले नाही मात्र त्यावेळेस नाव घेऊन भूमिका मांडू असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
पाठिंबा कुणालाच दिला नाही
पाच टप्प्यात निवडणूक पार पडत आहे. मी कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. तुम्हाला वाटेल त्याला तुम्ही मत द्या. नाशिकमध्ये देखील कुणालाच पाठिंबा दिला नाही. केवळ अफवा पसरत आहेत. सर्वांना विनंती आहे भावनिक होऊ नका. आपल्या लेकरांच्या बाजूने उभे राहा. आपल्या हिताचे कोण बोलतो त्याच्या पाठीशी उभे राहा. आपल्या लेकरांना न्याय मिळवून देईल त्याला मत द्या. जो मदत करेल त्याला मत द्या.
त्रास देणाऱ्यांना विसरू नका..
धनंजय मुंडे जातीवाद करत नाही असा मला विश्वास होता. पण आता ते पण करू लागले असे वाटते. ते पोस्ट करायला लावू लागले. त्यांचे लोक काहीही मेसेज समाजमाध्यमांवर पोस्ट करत आहेत; मात्र मराठा समाजाला सांगतो शांत राहा. आपल्याला दिलेला त्रास विसरू नका. हे पाया पडतील आणि पुन्हा विसरून जातील. मतांमधून आपली ताकद दाखवा. बीडमधील नारायण गडावर होणारी सभा रद्द झाली. कारण तिथे तयारी नव्हती. सर्वांचे हाल झाले असते. पुन्हा यापेक्षा ताकदीने मोठी सभा करू. तिथे अडचणी आहे त्यामुळे नागरिकांचे हाल झाले असते, असे मनोज जरांगे म्हणाले.