महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : भाजप सत्तेत नकोच!

Maratha Reservation : जरांगेंनी घेतली सत्तेतून खेचण्याची शपथ

Manoj Jarange Patil vs BJP : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी (दि.२४) पाचव्याच दिवशी आपले उपोषण स्थगित केले. उपोषण स्थगित करताना त्यांनी नेहमी प्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्याचवेळी भाजपला सत्तेतून खेचण्याची शपथही घेतली. ‘इतर पक्षाचे आमदार निवडून आले तरी चालतील, मात्र यावेळी भाजपचा एकही आमदार जिंकू देऊ नका,’ असं आवाहन त्यांनी समाज बांधवांना केलं.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे उपोषणाला बसले होते. पण त्यांनी ऐनवेळी उपोषण स्थगित केले. ‘सलाईन लावून उपोषण करण्याला काहीही अर्थ नाही. मी येत्या 13 ऑगस्टपर्यंत सरकारला वेळ देतो. तोपर्यंत त्यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात,’ अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. तत्पूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार प्रसाद लाड यांच्यासह भाजपाला हरविण्याची शपथ घेतली.

फडणविसांची आग मीच विझवणार !

‘भाजपचा एकही आमदार निवडून येऊ द्यायचा नाही. यांना सत्तेतून खेचायचे आहे. आताच काय पुढेही भाजपला कधीच सत्तेत येऊ देऊ नका. फडणविसांची आग मीच विझवणार आहे,’ या शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला.

फडणविसांनी आरोप फेटाळले

2013 मध्ये नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याच्या प्रकरणात जरांगे पाटलांच्या विरोधात अजामिनपात्र अटक वॉरंट जारी झालंय. मात्र यामागे, गृहमंत्री फडणवीसांचाच हात असून जेलमध्ये टाकून गोळ्या घालण्याचा डाव आहे, असा आरोप जरांगेंनी केला आहे. मात्र ही न्यायालयीन प्रक्रिया असल्याचे सांगत फडणविसांनी आरोप फेटाळले आहेत.

डोक्यावर परिणाम झाला होता

‘मनोज जरांगे यांची केस 2013 ची आहे. यापूर्वी त्यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट निघालेले आहेत. पण तारखेवर हजर राहिलं तर वॉरंट रद्द होतो. पुन्हा ते तारखेवर गेले तर त्यांचा वॉरंट रद्द होईल. आमचा त्यात काहीही संबंध नाही. मी त्यांना दोष देणार नाही. उपोषणाच्या शेवटी ते माझ्या आईवर बोलले होते. नंतर त्यांनी माफी मागितली होती. उपोषणामुळे माझ्या डोक्यावर परिणाम झाला होता असं ते म्हणाले होते,’ अशी बोलकी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.

दरेकरांनाही वठवणीवर आणण्याची धमकी

माध्यमांशी बोलतांना जरांगेंनी आपला मोर्चा दरेकरांकडेही वळवला. फडणवीसांसह दरेकरांनाही वठवणीवर आणतो, असा इशारा त्यांनी दिला. आतापर्यंत उपोषणाच्या माध्यमातून जरांगे सरकारवर दबाव आणत होते. मात्र आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी जरांगेंनी केली आहे, असे दिसते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!