Maharashtra Politics : मराठा आरक्षणासाठी लढता लढता मनोज जरांगे पाटील यांना राजकीय भुताची बाधा झाली आहे. जरांगे यांच्यावरील राजकारणाचे भूत काही उतरायला तयार नाही. मूळ आरक्षणाचा विषय सोडून जरांगे आता केवळ राजकीय भाषा बोलत आहेत. आता तर ते सरकारच्या लाडक्या बहीण योजनेवर बोलत आहेत. मनोज जरांगे बोलत असलेले कोणतेही मुद्दे मराठा आरक्षण या विषयाशी संबंधित नाही. त्यामुळे आपल्या राजकीय भुताच्या आनंदासाठी ते मराठा समाजाचा वापर करीत आहेत, अशी टीका भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या कोणत्याही धमक्यांना भीक घालत नाही. जरांगे यांना अहंकार आला आहे. आमचा पारा चढायला लावू नका. आतापर्यंत व्यक्तीगत टीका कधीच केलेली नाही. केवळ मराठा समाजासाठी जरांगे यांनी बोलावे. जरांगे जर केवळ मराठा आरक्षणक (Maratha Reservation) या विषयावरच बोलत असतील तर आपण कोणतीही अट न ठेवता त्यांच्यासोबत राहू, असेही दरेकर म्हणाले. जरांगे उठसुठ देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, छगन भुजबळ, प्रसाद लाड यांना एकेरी बोलणार असतील तर ते अयोग्य असल्याचेही ते म्हणाले.
समाज सोडून जातोय
एकेरी बोलणे कोणत्याही संस्कृतीत बसत नाही. मराठा समाजाच्या लोकांना हे अजिबात आवडत नाही. जरांगेंनी त्याचे भान ठेवावे. समाजातील लोकांशी याबाबत बोलावे. शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली पडद्याआडून काही लोक मदत करीत आहेत. राजेश टोपे, रोहित पवार, उद्धव ठाकरेंशी संबंधित काही संघटना याच सूत्रसंचालन करत असल्याचेही दरेकर म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजासाठीचे आंदोलन पूर्णपणे दुसऱ्याच्या हातात गेले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना कायम टिकणारी असेल. त्याची काळजी घेतली आहे. महाराष्ट्रातील जनता, लाडके भाऊ, लाडकी बहीण, शेतकरी महायुतीचे सरकार आणतील. त्यामुळे जरांगेंचा तोल आता सुटताना दिसत आहे. हळूहळू त्यांचा विदुषक होत आहे की काय, असे दिसत असल्याचे दरेकर म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांचा द्वेष, तिरस्कार डोक्यातून काढायला हवा. फडणवीसांची महाराष्ट्राला गरज आहे त्यासाठी आपल्यासारखे कार्यकर्ते वाट्टेल ते योगदान, बलिदान द्यायला तयार आहेत. फडणवीसांनी संपविण्याचे नाही तर माणसं जोडण्याचे काम केले आहे. त्यांची मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षाची कारकीर्द महाराष्ट्राने पाहिली आहे. आताही त्यांचे काम महाराष्ट्रातील संपूर्ण जनता पाहात आहे. त्यामुळे भाजप आणि महायुती जोडण्याचे काम करते, असा टोलाही आमदार प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना लगावला.