मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा केली आहे. आता निवडणूक लढणार नाही, उमेदवार पाडणार, अशी घोषणा त्यांनी सोमवारी केली. त्यासंदर्भात बोलताना प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते बच्चू कडू यांनी ‘जरांगे हुशार आहेत. दबावाला बडणारा माणूस नाही’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मनोज जरांगे यांनी आज अचानक निवडणुकीतून माघार का घेतली?, असा प्रश्न बच्चू कडू यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी जातीपातीवर राजकारण होत नाही, असे सांगितले. ते म्हणाले, ‘माघार घेताना जरांगे म्हणाले की एका जातीवर राजकारण होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. सर्व राजकीय पक्ष धर्म आणि जातीवर निवडणूक लढवत आहे. त्याच्यासोबत पैशाची ताकद असतेच. हे समीकरण मोठ्या पक्षांनी सुरू केले आहे. त्यामुळे जरांगे जे बोलले ते योग्यच आहे. आपण केलेली कामं लोकांपुढे ठेवून निवडणूक लढवली पाहिजे. मात्र सर्व राजकीय पक्षांनी राजकारणाची व्याख्या बदलून दिली आहे.’
‘बच्चू कडू चार वेळेला निवडून आला. कारण लोकांनी निवडून दिलं. पक्षांची झुंडशाही मी माझ्या मतदारसंघातून संपवली. तेच आम्ही आता महाराष्ट्रात करू,’ याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. विशेष म्हणजे एका जातीच्या आधारावर राजकारण होत नाही हे तुम्ही मनोज जरांगेना आधी समजावून सांगितलं नव्हतं का, असा सवालही बच्चू कडूंना विचारण्यात आला. त्यावर जरांगे हुशार आहेत, असे कडू म्हणाले. ‘मी काही कुणाचा राजकीय गुरू नाही. त्यामुळे समजावून सांगण्याची गरज नाही. जरांगे तसे हुशार आहेत. जमिनीवर काम करणाऱ्या माणसाला समजावून सांगण्याची गरज पडत नाही. मोठ्या नेत्यांना समजावून सांगणारे पंधरा-वीस लोकं असतात. मात्र बच्चू कडूसारख्या जमिनीवरच्या कार्यकर्त्यांना समजावण्याची गरज पडत नाही.’
जरांगेंवर दबाव होता का?
जरांगे यांच्यावर राजकीय दबाव असल्याची शंकाही व्यक्त होत आहे. त्यासंदर्भात ‘जरांगे दबावला बळी पडणारा माणूस नाही,’ अस बच्चू कडू म्हणाले. जरांगेंच्या निर्णयामुळे कुणाला फायदा होईल याचे असे मोजमाप यंत्र नाही. जमिनीवरची राजकीय परिस्थिती वेगळी असते, असंही ते म्हणाले.
परिवर्तन महाशक्तीला पाठिंबा?
मनोज जरांगे परिवर्तन महाशक्तीला पाठिंबा देतील का, असाही प्रश्न बच्चू कडू यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ‘यासंदर्भात संभाजी राजे निर्णय घेतील. कोणीही पाठिंबा दिला तरी फायदा होतोच. कोणीही चेंडू टाकला तरी आम्ही मजबूत बॅटिंग करतो. बच्चू कडूे बॅटिंग टाइमिंग आणि वार कसा असतो हे निवडणुकीत तुम्हाला माहित पडेल.’