महाराष्ट्र

Jalna : जरांगेचा फडणवीसांना फोन; आघाडीत अस्वस्थता

Manoj Jarange Patil : महत्वाच्या विषयांवर झाली चर्चा?

राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीतही आरक्षणचा मुद्दा गाजणार आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनानेही जोर पकडला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची एकही संधी जरांगे सोडत नाहीत. अशात जरांगेंनी थेट फडणविसांना फोन करणे आणि दोघांमध्ये चर्चा होणे. ही घटना महाविकास आघाडीत अस्वस्थता पसरवणारी ठरली आहे.

जरांगे यांनी आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी 29 सप्टेंबरपर्यंत अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडे अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यापूर्वी आरक्षण न दिल्यास पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. तसेच विधानसभा निवडणूक लढवण्याचीही तयारी असल्याचे जरांगेंनी म्हटले आहे. अशात मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले. त्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागेल. या पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे व देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फोनवर चर्चा झाली. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी अंतरावालीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी फोनवरून जरांगे आणि फडणवीसांचं बोलणं करून दिलं. तेव्हा या दोघांमध्ये मराठवाड्यातील नुकसानाच्या संदर्भात चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलताना आरक्षणावर चर्चा झाली नाही. शेतकरी चारही बाजूने संकटात सापडला आहे. त्यांचे हाल होत आहेत. हा विषय महत्त्वाचा वाटला म्हणून त्या मुद्द्यावर चर्चा झाली असे मनोज जारांगेंनी स्पष्ट केले.

आठ दिवसांत मदत द्या !

फडणवीस यांच्याशी बोलताना आठ दिवसात शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या, असं मी त्यांना बोललो. तुम्ही मदत देत असताना आठ दिवसांनी देतो, दहा दिवसांनी देतो असे म्हणता. आणि दोन वर्षांनी देता. असं करू नका. तुम्हाला शेतकरी निवडणुकीत पाडल्याशिवाय सोडत नाही. असं बोलणं झाल्याचंही मनोज जरांगे म्हणाले.

कोण किती लबाड हे कळेलच

शेतकऱ्यांच्या मदतीबाबत कोण किती लबाड बोलते हे कॅबिनेट बैठक झाल्यावर कळेलच. शेतकऱ्यांचा कानावर सरसकट शब्द गेलेला आहे. आणि शेतकऱ्यांची कोणीही फसवणूक करू शकत नाही. त्यांनी शेतकऱ्यांना फसवले तर शेतकरी त्यांना फसवणार असं समजायचं. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मिळणारा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवला असेल तर ही वाईट घटना आहे. मग सरकार खूप वाईट चाल खेळत आहे, असंही जरांगेंनी म्हटलं आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!