New Delhi : दिल्लीच्या दारू धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदिया यांना पुन्हा एकदा झटका बसलाय. राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 26 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली. दारू घोटाळ्याशी संबंधित ईडी प्रकरण आहे.
माजी उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने 26 फेब्रुवारी 2023 रोजी “घोटाळ्यात” कथित भूमिकेसाठी अटक केली होती. ईडीने 9 मार्च 2023 रोजी सीबीआय एफआयआरशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सिसोदिया यांना अटक केली. 28 फेब्रुवारी 2023 रोजी सिसोदिया यांनी दिल्ली मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता.
मनीष सिसोदिया यांच्यावर सीबीआय तसेच ईडीने दिल्ली उत्पादन शुल्क धोरणात सुधारणा करताना, परवाना धारकांना अवाजवी लाभ देणे, परवाना शुल्क माफ करणे किंवा कमी करणे आणि सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरी शिवाय परवाने जारी केल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 एप्रिल रोजी 11 वाजता होणार आहे. ज्या कागदपत्रांची तपासणी झाली नाही, त्या कागदपत्रांची यादी जमा करावी, असे निर्देश कोर्टाने आजच्या सुनावणी दरम्यान दिलेत. न्यायालयाने यापूर्वी आम आदमी पक्षाचे नेते सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 18 एप्रिलपर्यंत वाढ केली होती.
सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना त्यांचे वकील मोहित माथुर यांनी न्यायालयात युक्तीवाद केला. या प्रकरणाची चौकशी करण्यात जाणून बुजून उशीर केला जात आहे. याच प्रकरणातील अजून एक आरोपी बेनॉय बाबू याच्या जामीन याचिकेचा हवाला देताना वकील माथुर म्हणाले की, सिसोदिया हे आता कोणत्या मोठ्या पदावर नाहीत. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सिसोदिया यांच्या भूमिकेची ईडी आणि सीबीआय दोन्ही चौकशी करत आहेत.
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर अकोल्यात संताप
दिल्ली दारू धोरण तयार करण्यात आणि अंमलबजावणीमध्ये कथित भ्रष्टाचार झाल्याचा दावा ईडीने केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे त्याचे मुख्य सूत्रधार आहेत. केजरीवाल यांच्यासह ‘आप’चे अनेक नेते आणि मंत्रीही या संपूर्ण प्रकरणात अडकले आहेत.