BJP Vs NCP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे साताऱ्यातील नेते माणिकराव सोनवलकरांनी अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा शरद पवारांच्या गटाला मोठा धक्का मानला जात आहे. माणिकराव सोनवलकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. सोनवलकर यांच्यासह 5 हजार कार्यकर्त्यांनी देखील भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी काँग्रेसवर निशाणा साधला. ‘विधानसभा निवडणुका जवळ आल्याने महाविकास आघाडी विविध पक्षांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील 14.5 कोटी जनतेला माहीत आहे. काँग्रेसचे सरकार असताना अशा घटना कधीच घडल्या नाहीत. कारण कोणतेही घाणेरडे राजकारण नव्हते. जेव्हा जेव्हा केंद्रात असो वा राज्यात असो, काँग्रेसच्या विरोधात सरकार स्थापन होते, तेव्हा समाजात तेढ निर्माण करण्याचे, संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत असतात,’ असे बावनकुळे म्हणाले.
फलटण पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय सोडमिसे, माजी पंचायत समिती सदस्य संजय कापसे, संतकृपा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा विलासराव नलवडे, फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अजय माळवे, युवा नेते सुधीर अहिवळे यांच्यासह फलटण तालुक्यातील विविध गावच्या सरपंचांनी देखील यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप नेत्या चित्रा वाघ आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचीही यावेळी उपस्थिती होती.
कोण बाजी मारेल?
येत्या काही महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यातील सत्ताधारी पक्षाची महाआघाडी म्हणजेच एनडीए आणि विरोधी महाविकास आघाडी हे दोन्ही पक्ष निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. दोन्ही आघाडीत सामील असलेल्या पक्षांमध्ये जागावाटपाबाबत बैठका सुरू आहेत. एकीकडे एनडीएमध्ये जागावाटपावरून राजकारण सुरू आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतही तीच स्थिती आहे. जागावाटपानंतर राजकारणाला वेग येणार असून यावेळच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे वेळच सांगणार आहे.
कोण आहेत सोनवलकर?
सातारा जिल्हा परिषदेचे माजीअध्यक्ष माणिकराव सोनवलकर हे 1993 पासून राजे गटाचे निष्ठावंत म्हणून कार्यरत होते. पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, दुधेबावीचे सरपंच अशी मोठी राजकीय पदाची जदाबदरी होती. धनगर समाजाचे नेते म्हणून त्यांना पाहिले जाते. एकूणच फलटण तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात माणिकराव सोनवलकर यांचे विशेष महत्त्व आहे.